पुणे : लेखणीची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा अधिक ताकदवान असते. परंतु, देशात सध्याच्या काळात लेखणीतून आवाज उठवणाऱ्यांचा आवाज हा बळाचा वापर करून बंद केला जात आहे. आपले शब्द आणि कल्पनासामर्थ्य यांना शक्ती व अधिकार यांच्या सहाय्याने नियंत्रणात आणले जात आहे, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत खासदार डॉ. शशी थरूर यांनी व्यक्त केली.
सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आॅनलाइन ‘साहित्य महोत्सव २०२०’ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘थरूरसोरस’ या पुस्तकाचे प्रकाशन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर व कुलगुरू डॉ. राजनी गुप्ते उपस्थित होते.
थरूर म्हणाले, लिबरल आर्टस् सारख्या विषयांमध्ये एखाद्या संकल्पनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असू शकतो व त्यामुळेच एकाच गोष्टीचे विविध प्रकारे विश्लेषण करता येते. आजपर्यंत लिबरल आर्टस्सारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी व पालक या सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये लिबरल आर्टस् सारख्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत.भाषा प्रांताला एकत्र जोडणारा धागा : अख्तरधर्माच्या आधारावर देश बनत नाही. धर्म हा दैनंदिन जीवनातला एक छोटासा भाग आहे. उर्वरित आयुष्य आपण धर्मनिरपेक्षतेनेच जगत असतो. त्यामुळे धर्माला जगभरच विनाकारण अधिक महत्त्व दिले गेले आहे. याउलट भाषा हा संपूर्ण प्रांताला एकत्र आणणारा धागा आहे, अशा शब्दात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी भाषेचे महत्व उलगडले.