(स्टार १२२७ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्क ५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरांमध्ये काहीशी घसरण झाली आहे. सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा आणि पामतेलाच्या भावात लिटरमागे साधरण १५ ते २० रुपयांनी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र, मराठवाडा आणि विदर्भात मागील काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्याचा शेतमालाबरोबर भुईमूग आणि सूर्यफुलाला देखील फटका बसत आहे. नेमका आता माल काढणीचा हंगाम असतो. त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. आता जरी शासनाने ५ टक्के ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी पावसामुळे शेंगदाणा आणि सूर्यफुलाच्या पुरवठ्यावर परिणाम हाेऊ शकतो. त्यामुळे पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-----
* तेलाचे दर (प्रति लिटर)
ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १२०-१२५ १०५-११०
सूर्यफूल २४०-२५० २२०-२३०
पामतेल ६०-७० ५०-६०
शेंगदाणा १४०-१७० १२५-१५०
-----
* म्हणून दर झाले कमी
साधारण १० ऑगस्टच्या दरम्यान शासनाने पाच टक्के ड्यूटी कमी केली आहे. त्यामुळे एका लिटरमागे साधारण १५ ते २० रुपयांपर्यंत भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन तसेच शेंगदाण्याच्या तेलाचे लिटरमागे दर कमी झाले आहेत.
- कन्हैयालाल गुजराथी, व्यापारी
-----
* किराणा खर्चात बचत
गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने खाद्यतेलाच्या भावात वाढ होत होती. त्यामुळे घर चालवताना प्रचंड कसरत करावी लागत होती. शासनाने ड्यूटी कमी केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
- सुनीता हारगुडे, गृहिणी