पुणे : ईडीकडून राज्यात कारवाईचा जोरदार धडाका सुरु आहे. यात राजकीय नेतेमंडळी यांच्यासह प्रसिद्ध व्यावसायिकांवर कारवाईचा मोठा बडगा उचलण्यात आला आहे. याचदरम्यान पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची देखील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु आहे. ईडीकडून सोमवारी (दि. ९) भोसले यांची सुमारे ४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर आर्थिक व्यवहार ईडीकडून चौकशी सुरू आहे. मागील काही महिन्यात देखील चौकशी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात त्यांची तब्बल ५ तास चौकशी करण्यात आली होती. भोसले यांची सुमारे ४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याआधीच्या कारवाईत देखील ईडीने ४० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. भोसले यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा ईडीला संशय आहे.
अविनाश भोसले यांच्या कंपनीकडून पुण्यात एका सरकारी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केलं जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी अविनाश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकऱणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान समोर आलेल्या इतर अनेक व्यवहारांची देखील ईडीकडून तपासणी केली जात आहे. भोसले यांची सध्या जप्त करण्यात आलेली जमीन ही ४ कोटी ३४ लाख रुपयांची आहे.
भोसले यांनी पुण्यातील आणि नागपुरातील ही जमीन फेमा कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. अविनाश भोसलेंनी दक्षिण मुंबईत खरेदी केलेल्या १०३ कोटी ८० लाख रुपयांच्या एका फ्लॅटची देखील सध्या चौकशी केली जात आहे. या प्रकरणात ईडीनं ११ फेब्रुवारी या दिवशी भोसलेंच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर १२ फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्याच्या दुसऱ्या दिवशी अविनाश भोसले आणि अमित भोसलेंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र हे दोघंही चौकशीला हजर राहिले नाहीत.