- नितीन चौधरी
पुणे : मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची मोहीम सध्या राज्यात सुरू असून ९ कोटी मतदारांपैकी ३ कोटी ९१ लाख अर्थात ४३ टक्के मतदारांनी आधार जोडणी केली आहे. यात सजग आणि सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुणेकरांचा क्रमांक मात्र, तळात आहे, तर मागास समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्याने ७० टक्के आधार जोडणी करून आघाडी घेतली आहे. आधार जोडणीचे काम वेगाने करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या असून, आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर हा उपक्रम वेगाने राबविण्याची जबाबदारी या निमित्ताने वाढली आहे.
राज्यासह देशभर सध्या मतदार यादीला आधार नोंदणीचे काम सुरू आहे. आधार नोंदणीमुळे दुबार नावे असलेली नावे समोर येणार आहेत. सध्या आधार नोंदणी ही ऐच्छिक असल्याने दुबार नाव वगळा, अशी विनंती मतदाराने केल्यानंतरच त्याचे नाव वगळण्यात येत आहे. मात्र, आधार जोडणी केल्यानंतर सापडलेल्या दुबार नावांना वगळण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगच निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.
राज्यातील आधार नोंदणीवर एक नजर टाकल्यास वाशिम जिल्ह्यात ७०.१९ टक्के मतदारांनी आधार मतदार यादीला जोडले आहे. त्यानंतर यवतमाळ ६९.४२ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६८.६६ टक्के मतदारांनी आधार जोडले आहे, तर सुशिक्षितांचे समजले जाणाऱ्या पुण्यात मात्र, केवळ १०.१४ टक्के मतदारांनी आधार मतदार यादीला जोडले आहे. याबाबत देशपांडे म्हणाले, “शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, शहरात परिस्थिती वेगळी आहे. आम्ही आधार क्रमांक का जोडू इथपासून आमचे आम्ही पाहून घेऊ, अशा स्वरूपाची उत्तरे शहरी भागातील नागरिक देत आहेत. त्यामुळे जनजागृतीची किती आवश्यकता आहे, हे दिसून येते.”
तर ९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या काळात राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यात ४ लाख ८४ हजार ८०५ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. या अर्जांच्या छाननीचे काम सध्या सुरू असून येत्या ५ जानेवारीला प्रकाशित होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या नावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर दुबार नावे असलेल्यांनी आपले नाव वगळण्यासाठी अर्ज केला आहे. ही संख्या १ लाख ५४ हजार ६७२ इतकी आहे. त्यामुळे ही नावे आता योग्य छाननीनंतर कमी होणार आहेत, असेही ते म्हणाले.
जिल्हानिहाय आधार नोंदणी (टक्क्यांत)
वाशिम ७०.१४, यवतमाळ ६९.४२, रत्नागिरी ६८.६६, हिंगोली ६८.३६, सातारा ६७.१५, गडचिरोली ६५.९९, बुलढाणा ६५.४६, भंजारा ६४.९५, उस्मानाबाद ६४.९२, परभणी ६६.८९, कोल्हापूर ६४.५१, जालना ६३.३१, बीड ६२.०५, नांदेड ६१.७६, लातूर ६१.११, गोंदिया ६०.१६, सांगली ५९.५६, सिंधूदुर्ग ५८.२३, नगर ५६.८७, वर्धा ५४.२४, चंद्रपूर ५२.९०, अमरावती ५२.१३, रायगड, ५०.०३, नंदूरबार ४९.७३, औरंगाबाद ४८.५६, सोलापूर ४७.८३, नाशिक ४७.४९, धुळे ४७.३१, जळगाव ४६.७३, अकोला ४५.६६, नागपूर २८.५७, पालघर २६.०४, मुंबई उपनगर १७.५६, मुंबई शहर १६.३८, ठाणे १०.१६, पुणे १०.१४ एकूण ४३.४६
राज्यातील एकूण मतदार : ९ कोटी ५५ हजार ५४८
पुरुष : ४ कोटी ७० लाख २६ हजार ९३१
महिला : ४ कोटी ३० लाख २४ हजार २५४
तृतीयपंथी : ४३६३
आधार जोडलेले मतदार : ३ कोटी ९१ लाख ४० हजार ३४२
आधार न जोडलेले : ५ कोटी ९ लाख १५ हजार २०६.