पुणे : न्यायालयात दंडाची रक्कम जमा करून घेऊन ती कोषागारात न भरता तिचा अपहार केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे पाटील यांनी तत्कालीन नाझरला सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ इनायतुल्ला अब्दुल खान (वय ६१, रा़ घोरपडे पेठ) असे या नाझरचे नाव आहे़ १४ आॅगस्ट १९९७ रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तब्बल १९ वर्षे ७ महिने आणि ८ दिवसांनी निकाल लागला आहे़ जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक रत्नाकर कुलकर्णी यांनी १४ आॅगस्ट १९९७ रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ कुलकर्णी व एस़ एस़ संगमवार यांनी १५ आॅक्टोबर १९९४ ते ८ आॅक्टोबर १९९६ या कालावधीतील हिशोबाची तपासणी केली़ गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र नागणे यांनी केला़ या खटल्यात सहायक सरकारी वकील उज्ज्वला स़ पवार यांनी ४ साक्षीदार तपासले़ सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून खान यांना सरकारी कर्मचाऱ्याने अपहार केल्याबद्दल २ वर्षे सक्तमजुरी, २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
अपहारप्रकरणी २० वर्षांनी शिक्षा
By admin | Published: March 24, 2017 4:31 AM