पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील बॉस्को फर्निशिंग प्रा. लि. चे अरविंद माणिकलाल शहा यांनी मधुर प्रिंटस, सुरत यांच्याकडून पडद्यासाठी कापड मालाची आॅगस्ट १९९८ मध्ये मागणी केली होती. मात्र त्यांच्या दुकानापासून शेजारीच असलेल्या भावाने सदर कपड्याचा मालाचा ट्रक, माल उतरविण्यासाठी आल्यानंतर सख्खा भावाचे दुकान बंद असल्याचा फायदा घेऊन स्वत:च्या दुकानात माल उरतरवून घेत त्यानंतर अरेरावी केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी प्रथम न्यायवर्ग दंडाधिकारी एस. बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने दोषी भावाला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.रणजित माणिकलाल शहा (वय ६२, रा. सदाशिव पेठ) असे शिक्षा सुनविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वयोमान व प्रकृती अस्वस्थेच्या कारणामुळे २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर एक वर्षांकरीता सदवर्तनाच्या हमीवर सुटका केली आहे. याबाबत अरविंद माणिकलाल शहा यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र केसच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने, त्यांच्या वतीने आशय अरविंद शहा यांनी केस पुढे चालवली. अरविंद शहा व रणजित शहा यांच्यात दुरावा झाल्याने दोन्ही कुटुंब एकमेकापासून विभक्त झाले होते. अरविंद शहा यांच्या दुकानाशेजारीच रणजित शहा यांचे बॉस्को डिपार्टमेंट व सिद्धार्थ फर्निशिग नावाचे दुकान आहे. सुरत येथून जे. डी. रोडवेज यांच्या ट्रान्सपोर्टने कपड्याच्या मालाची आॅर्डर आली असता, भावाचे दुकान बंद पाहून रणजित यांनी सदर माल स्विकारून चलनावर सही केली. सदर केस दाखल झाल्यानंतर रणजित शहा यांनी तक्रारदाराशी समझोता करावा याकरिता, दबाव आणुन सतत त्रास देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याची बाब न्यायालयात सिद्ध झाली आहे. फिर्यादीच्या वतीने अॅड. महेश गोगावले यांनी चार साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)
फसवणूक प्रकरणी शिक्षा
By admin | Published: December 23, 2016 12:58 AM