पुणे: "गेली दोन वर्षे कोरोनामुळे तुम्ही घरी होतात. त्यावेळी कसा अभ्यास केला, तुम्हाला ऑनलाईन शिकवलेले समजले का, पाठ्यपुस्तके कीती जणांनी वाचली?" अशा प्रश्नांचा भडिमार करत राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांची शाळा घेतली. शाळेच्या पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी आयुक्तांनी भवानी पेठेतील महापालिकेच्या आचार्य विनोबा भावे शाळेला भेट दिली त्यावेळी त्यांनी विद्यार्थाशी थेट संवाद साधला.
आयुक्त मांढरे यांनी सकाळी 9 वाजता भावे शाळेत आगमन करताच शाळेच्या प्रवेशद्वारावर इयत्ता दिव्यांग विदयार्थी अन्सार शेख या विद्यार्थ्याला गुलाबाचे फुल व कोरोना किट हातात देऊन त्याचे स्वागत केले. यावेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मीनाक्षी राऊत, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर व इतर शिक्षण अधिकारी उपस्थित होते.
यानंतर त्यांनी शाळेच्या पहिल्या मजल्यावर जाऊन आयुक्तांनी नियोजित कार्यक्रम ठेवलेल्या हॉलमध्ये न जाता त्यांनी थेट इयत्ता नववी च्या वर्गात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शिक्षकांची शाळा घेतली. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवायचे याच्या सूचना दिल्या.
तीन भागांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करा
आयुक्त मांढरे यांनी विद्यार्थांना आकलन झाले आहे त्यानुसार त्यांना तीन भागात विभागणी करा असे सुचवले. 'ज्यांना समजले त्यांना शाळेत लीडर बनवा. कपड्यावर आधारित लिडरशीप नको तर ज्ञानाधारीत हवी, आज जो मुलगा शांत गरीब वाटतो तो पुढे राज्य करू शकतो हे लक्षात ठेवून सर्वांना शिक्षण द्या' अशा सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या
दोन वर्षात काय केले? गेले दोन वर्षे तुम्ही काय केले, आपले दफतर कोठे होते, तुमचे कसे शिक्षण झाले, कोविड किती लोकांना झाला, दोन वर्षे शाळा बंद होती आता काय फरक वाटतो, शिकवलेले सगळे समजते का असे प्रश्न विचारून त्यांनी थेट विद्यार्थ्यांना बोलते केले. त्यांच्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनीही मनमोकळे पणाने उत्तरे दिली.