पुणे : ‘प्रवेश कॉलेजमध्ये आणि शिक्षण खासगी क्लासमध्ये’ अशी अभद्र युती करणाऱ्या कॉलेजेस विरोधात शिक्षण विभाग कडक पावले उचलणार आहे. यावर्षीपासून वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी तपासण्यासाठी कॉलेजेसला अचानक भेटी देण्याची धडक मोहीम आखली जाणार आहे. ‘कॉलेज-क्लासेसची दुकानदारी’ असे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यार्थ्यांची वर्गामध्ये ७५ टक्के उपस्थिती असणे बंधनकारक आहे; पण या नियमाला केराची टोपली दाखवत शहर व परिसरातील काही कॉलेजेसनी खासगी क्लासेसशी संगनमत केले आहे. कॉलेजमध्ये केवळ नावापुरता प्रवेश घेऊन सर्व शिक्षण क्लासेसमध्येच घ्यायचे. वर्गातील हजेरी कॉलेजकडून परस्पर लावली जाईल, असे सांगून विद्यार्थ्यांकडून अधिकचे पैसे घेतले जात आहेत. वर्गात बसण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजेसकडून सवलत दिली जात आहे. केवळ परीक्षा व प्रात्यक्षिकांसाठीच कॉलेजमध्ये यावे लागेल, असे त्यांना सांगितले जात आहे. यावर स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. पुणे विभागाच्या सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गामध्ये ७५ टक्के उपस्थिती असणे बंधनकारक आहे; अन्यथा परीक्षेला बसू दिले जाणार नाही. यंदापासून कॉलेजमध्ये अचानक भेटी दिल्या जातील. हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष हजेरी घेतली जाईल. अशा चुकीच्या गोष्टींना आळा बसणे आवश्यक आहे.’’केवळ खासगी क्लास लावून सीईटी किंवा इतर परीक्षांचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने होत नाही. वर्गातील उपस्थितीही आवश्यक आहेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्लासेस किंवा कॉलेजकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन राऊत यांनी केले.
शिक्षण विभाग घेणार कॉलेजेसची ‘हजेरी’
By admin | Published: June 12, 2016 6:02 AM