पुणे : हुंड्यासाठी छळ करून वर्षभराच्या आतच विवाहितेचा हुंडाबळी घेणाऱ्या महापालिकेचा कनिष्ठ अभियंता असलेल्या पतीला आणि त्याच्या आई-वडिलांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद नासीर एम. सलीम यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. पती अजिंक्य सुहास क्षीरसागर (वय २७), सासरा सुहास शामसुंदर क्षीरसागर (वय ५९) आणि सासू मंगला सुहास क्षीरसागर (वय ५०, तिघेही, रा. पिंपळे गुरव) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. स्नेहल अजिंक्य क्षीरसागर (वय २१) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचे वडील संजय मोहनराव पांगारे (वय ४५, रा. औरंगाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मे २०१३ रोजी घडली. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी १३ साक्षीदार तपासले. याप्रकरणी न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०४ (ब) नुसार (हुंडाबळी) दोषी ठरवत तिघांना शिक्षा सुनावली.(प्रतिनिधी)
हुंडाबळीप्रकरणी अभियंत्याला शिक्षा
By admin | Published: April 25, 2017 4:22 AM