पुणे : सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत. शिक्षकांकडे, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. बनावट डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेताही जोरदार टीका केली.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित बाबूराव घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण, महापालिकेतील नेते चेतन तुपे, बाबूराव चांदेरे, जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, राजेंद्र घाडगे, मोहन देशमुख आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शिक्षकांची भरती बंद आहे, बीपीएडची तर वाट लागलीय, मानधन प्रलंबित आहे. मुंबई विद्यापीठाचा अद्याप निकाल नाही. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचे अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याची टीका पवार यांनी केली. शिक्षक पुरस्कार वेळेवर दिले जात नाहीत, गरिबांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीवर मंत्र्यांच्या मुलांना परेदशात शिक्षणासाठी पाठवले जाते, अभ्यासक्रमात कुठला धडा असावा, तसेच कुठला नसावा, कोणाला वगळावं, वगळू नये यामध्ये हस्तक्षेप सुरू आहे.शिक्षणाबाबतची तक्रार कोणाकडे करायची, हा प्रश्न पडलेला आहे. सरकारकडून शिक्षणाची थट्टा सुरू असून सरकार सरसकट शिक्षण संस्थांना दरोडेखोर म्हणून शिक्षणाचा अपमान करीत आहे. तसेच शिक्षण विभागाने दहा लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायचे असे सांगितले. मात्र, एक दिवस फुटबॉल खेळून राज्य फुटबॉलमय होणार आहे का,’’ असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.
बनावट डिग्रीचा व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्याने शिक्षणाची वाट लागली-अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:50 AM