पुणे : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले.पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करण्याच्या निर्णयावर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन टीका केली. समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षणमंत्री शब्दांचा खेळ करत आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोट बोलत असल्याचा आरोप तावडेंनी केला होता. मात्र, हा आरोप म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच मी आणि पवारसाहेब कधी खोट बोललो हे तावडेंनी दाखवावे, असे आवाहन देखील त्यांनी तावडेंना केले.
एका बाजूला सरकार शाळा बंद करणार नसल्याचे सांगत, मात्र दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येच कारण देत समायोजित करण्याचे सांगितले जाते. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठविणे म्हणजे शाळा बंद करणे असच होत असल्याचं सुळे यांनी यावेळी सांगितले.
... जेव्हा चाचा चौधरी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. सर्वशिक्षा अभियानाच्या अंतर्गत अवांतर वाचनासाठी देशभरातील जिल्हा परिषदांना पुस्तके देण्यात येतात. त्यात 2017-18साली चाचा चौधरी आणि मोदी असे चित्ररूपी पुस्तकही देण्यात आले होते. त्यात चाचा चौधरी ही व्यक्तिरेखा मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे.या पुस्तकाची किंमत 35 रुपये आहे.हे पुस्तक प्रत्येक जिल्हा परिषदेतून शाळांमध्ये देण्यात आले.आम्ही शिक्षणामध्ये कोठेही राजकारण करत नाही. मात्र, जिल्ह्या परिषदेच्या शाळांमध्ये 'चाचा चौधरी आणि मोदी' यासारखी पुस्तके आणून सरकारच राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी सुळे यांनी केला आहे. तसेच शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टिकाही त्यांनी केली.