पुणे : गर्दीचा फायदा घेऊन रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्याला रेल्वे न्यायालयाने २४ तासांत शिक्षा सुनावली़ एन. आकाश एन. कैलास नाडे (वय १९, रा़ जुना पूल, सातारा रोड, हैद्राबाद, आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे़ त्याला न्यायालयाने ३ महिने कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा दिली आहे़ दत्तू गोविंद रावळकर (वय २७, रा़ सावळदबारा, ता़ सोयगाव, जि़ औरंगाबाद) हे त्याचे मित्र सागर तायडे यांच्यासह २३ जानेवारी २०१७ रोजी नागपूरला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आले होते़ महाराष्ट्र एक्स्प्रेस रात्री ११ वाजून १० मिनिटांनी प्लॅटफॉर्म १ वर आली़ ते जनरल डब्यात चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन नाडे याने त्यांच्या खिशातील दोन मोबाईल चोरले़ हे रावळकर यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला़ प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी नाडे याला पकडले़ पोलीस अधीक्षक डॉ़ प्रभाकर बुधवंत, उपअधीक्षक प्रफुल्ल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव, सहायक पोलीस निरीक्षक हिंमत माने पाटील, उपनिरीक्षक मुंतोडे, हवालदार भिमा हगवणे, साळुंखे यांनी तातडीने दोषारोपपत्र तयार करून आरोपीला न्यायालयात हजर केले़ न्यायालयात आरोपीने गुन्हा कबूल केला़ त्यामुळे न्यायालयाने त्याला ३ महिने कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)
मोबाईलचोराला २४ तासांत शिक्षा
By admin | Published: January 25, 2017 2:20 AM