डिंभे - उन्हाळी सुटीनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या. नवी शाळा, नवे मित्र याचबरोबर बदललेल्या दहावीच्या अभ्यासक्रमासह पहिली व आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा नव्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार आहे. घोकंपट्टीला फाटा देऊन प्रत्येक विषयाच्या पुस्तकातील ज्ञान व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न नवीन अभ्यासक्रमात केला आहे. व्यवसायाभिमुख आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आकलनकेंद्रित संकल्पनेवरील धडे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात शिकायला मिळणार असून, घोकंपट्टीला फाटा देऊन कृतिशील शिक्षणावर नवीन अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे.उन्हाळ्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासह यंदा दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच पहिली व आठवीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. या अभ्यासक्रमातील बदलाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. गणित आणि विज्ञान वगळता सर्व विषयांची परीक्षा १०० गुणांची होणार आहे. त्यामुळे शाळांकडून अंतर्गत मूल्यमापनामध्ये मिळणारी गुणांची बरसात अता थांबेल. त्यामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचा खºया अर्थाने कस लागेल. भाषा विषयांबरोबरच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांच्या प्रश्नपत्रिकांची जागा आता कृतिपत्रिका घेणार आहेत. त्याअनुषंगाने अभ्यासक्रमाध्येही योग्य बदल झाले असून, येथून पुढे १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. केवळ विज्ञानासाठीच प्रात्यक्षिक परीक्षा असेल; त्यामुळे इतर विषयांना अंतर्गत मूल्यमापणातून मिळणारे २० गुण बंद होतील. सामाजिक शास्त्रांची १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये ६० गुण हे इतिहास, राज्यशास्त्र यासाठी आणि ४० गुण भूगोलासाठी, अशी विभागणी करण्यात आली आहे.दहावीच्या अभ्यासक्रमात कृतिशील, सर्जनशील, वैचारिक, उपयोजित ज्ञानावर भर देण्यात आला असून, आकलन आणि उपयोजन पद्धतीला अधिक महत्त्व दिले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीवाढीस चालना मिळणार आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार बदलत्या काळाचा विचार करून शैक्षणिक धोरणानुसार अभ्याक्रमात बदल केले जात आहेत.मागील वर्षी सातवी व नववीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. यंदा पहिली, आठवी व दहावीच्या अभ्यासक्रमांत बदल झाला. पुढील वर्षी दुसरी, तिसरी व अकरावीच्या अभ्यासक्रमांत बदल होणार आहेत.विद्यार्थी स्पर्धेतकमी पडू नयेत, स्वयंअध्ययनाचीकौशल्ये विकसित करण्याचे प्रयत्न नव्या अभ्यासक्रमात केले आहेत. पाठांतर करून घेण्याऐवजी अता शिक्षकांना खºया अर्थाने मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.शाळा सुरू होताच, पहिल्याच दिवसी विद्यार्थ्यांच्या हातात बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके पडली. नवीन वर्षे, नवीन शाळा याचबरोबर बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके हातात पडताच मुलांना कुतूहलाने या पुस्तकामध्ये नवीन काय आहे, हे शोधण्याचा मोह आवरला नाही.
पहिली, आठवीचा अभ्यासक्रम बदलला : घोकंपट्टीला फाटा देऊन कृतिशील शिक्षणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:40 AM