पुणे : वृक्षाची वाढ उत्तम होण्यासाठी त्याची लहान असताना काळजी घ्यावी लागते पण ते मोठे झाले की मजबूत होते. त्याचप्रमाणे मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. पुणे शहर पोलीस आयोजित मिशन परवाज उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. मिशन परवाज या मिशनद्वारे बेरोजगार मुसलमान मुलांना लेखी परीक्षा आणि मुलाखत कशी घ्यावी याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. या समारंभात पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकार, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, पोलीस उपायुक्त संजय कुमार बाविस्कर, मौलाना काझमी, मौलाना इंद्रिस आदी उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायलाच पाहिजे. त्यातून त्यांनाच फायदा होत आहे. पोलीस भरतीच्या वेळी मुले शारीरिकदृष्टया तर पास होतात परंतु लेखी परीक्षेत नापास होतात तर आपण त्यांच्या लेखी परीक्षेवर व इतर कमजोरीवर लक्ष देणे गरजेचे आहे. या मिशन परवाजच्या वतीने मुलांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन त्याना उत्तम मार्ग आम्ही दाखवणार आहोत. रवींद्र सेनगावकार म्हणाले, मिशन परवाजमुळे आयुष्यात जेवढी मुले पुढे जातील तेवढी मुले नक्कीच देशासाठी काहीतरी करून दाखवतील. या मिशनच्या वतीने तरुण मुलांना एक संदेश देणार आहे की त्यांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आपले जास्तीत जास्त लक्ष शिक्षणाकडे दयावे. शिक्षणामुळे आपले ज्ञान, कौशल्य या बरोबरच बुद्धिमत्ता वाढते व विचारही बदलतात. आपले विचार उत्तम असतील तर प्रगती निश्चितच होते.समारंभाचे प्रास्तविक बसवराज तेली आणि आभारप्रदर्शन बाजीराव मोहिते यांनी केले.
प्रगतीसाठी शि़क्षण हाच पर्याय : रश्मी शुक्ला; ‘मिशन परवाज’चे पुण्यात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 7:55 PM
मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
ठळक मुद्देमिशन परवाजच्या वतीने प्रशिक्षण देऊन दाखवणार उत्तम मार्ग : रश्मी शुक्लाशिक्षणामुळे आपले ज्ञान, कौशल्य या बरोबरच बुद्धिमत्ता वाढते : रवींद्र सेनगावकार