पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एनर्जी स्टडी विभागातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचे प्रस्ताव केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडे वेळेवर न पाठविल्याने त्यांची रक्कम थकलेली आहे. विद्यापीठाकडून प्रस्ताव पाठविण्यास विलंब होणे याला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर जबाबदार असून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्यांचे थकीत रक्कम अदा करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मुख्य इमारतीजवळ त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.स्कूल आॅफ एनर्जी स्टडीज या विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अनुदानातून दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. विद्यापीठ प्रशासनाने २०१४-१५ पर्यंत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव वेळेवर पाठविले. मात्र २०१६पासून हे प्रस्ताव वेळेवर पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची विद्यावेतनाची रक्कम थकली आहे.अनेक महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे त्यांना द्वितीय वर्षाचे शुल्क भरता आलेले नाही.विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्याने विद्यापीठाने त्यांचे निकालही राखून ठेवले आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे विद्यार्थ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये संबंधित विभागात अभ्यासक्रमाची जाहिरात प्रसिद्ध केली त्यानुसार विद्यार्थ्यांना गुणांनुसार दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन विद्यापीठाकडून दिले जाणार असल्याचे प्रवेशाच्या संबंधीच्या परिशिष्ट ‘अ’मधील कलम ३ (१) नुसार जाहीर केले होते. ते कुठून मिळणार, याबाबत टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या वेळी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन अदा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आताच्या २०१८-१९ मधील जाहिरातीमध्ये मात्र विद्यावेतन हे ऊर्जा मंत्रालयाच्या मान्यतेवर अवलंबून असल्याचे नमूद केले आहे. मात्र यापूर्वी प्रवेश घेतलेल्यांना हा नियम लागू नाही.भरपावसात उपोषण, जागा देण्यासही आडकाठीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल आॅफ एनर्जी स्टडी विभागातील विद्यार्थी भर पावसात मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर उपोषण करीत आहेत. या विद्यार्थ्यांना कुलगुरूंची गाडी लावली जाते त्या शेजारची जागा उपोषणासाठी उपलब्ध करून देणे शक्य असतानाही प्रशासनाकडून मुद्दामहून आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे भर पावसात डासांचा उपद्रव सहन करीत विद्यार्थी दोन दिवसांपासून उपोषण करीत आहेत.
प्रस्ताव न पाठविल्याने विद्यार्थी अडचणीत, जबाबदारी कुलगुरूंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 2:25 AM