लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील अंध विद्यार्थिनीच्या तक्रारीवर दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या. त्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. त्याचबरोबर तिला पुन्हा कुठलाही त्रास होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेऊ, असे कुलगुरू नितीन करमळकर यांनी सांगितले. राज्यशास्त्र विभागातील अंध विद्यार्थिनीला राज्यशास्त्र विभागप्रमुखाकडून त्रास देण्यात आल्याच्या तक्रारीवर कुलगुरूंनी गुरुवारी विद्यापीठामध्ये बैठक घेतली. बैठकीस प्रभारी कुलसचिव अरविंद शाळिग्राम, अंध विद्यार्थिनी, तिचे पालक, राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. हर्ष जगताप, प्रा. राजेश्वरी देशपांडे उपस्थित होते. बैठकीबद्दल माहिती देताना नितीन करमळकर यांनी सांगितले, ‘‘तक्रारदार विद्यार्थिनी व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख या दोहोंची बाजू ऐकून घेण्यात आली आहे. तक्रारदार विद्यार्थिनीचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्याचबरोबर तिला यापुढे त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. त्याचबरोबर कुलसचिवांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.’’दरम्यान, तक्रारदार विद्यार्थिनीला न्याय मिळावा यासाठी काही विद्यार्थी संघटनांकडून तिला पाठिंबा देण्यात आला आहे. त्याचबरोबर विभागप्रमुखांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे निवेदन एमएच्या काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिले आहे.
शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही
By admin | Published: June 23, 2017 4:46 AM