लक्ष्मण मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुलांच्या हस्तांतराबाबत तसेच त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही बालकल्याण समितीकडून हलगर्जीपणा झाल्याची अनेक उदाहरणे गेल्या दोन वर्षांत समोर आली आहेत. या अनागोंदी कारभारामुळे अनेक मुलींचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेकींना वेळेत शाळा सोडल्याचे दाखले न मिळाल्याने पुन्हा त्याच इयत्तेमध्ये बसण्याची वेळ आली. यासोबतच काही ठराविक संस्थांना मुले दिली जात असल्याचीही उदाहरणे समोर येऊ लागली आहेत.बालकल्याण समितीच्या अंतर्गत काम करणाºया अनेक संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे सुरू आहेत. याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संस्थांमधील मुलांना शैक्षणिक साहित्य, साबण, टुथपेस्ट, टुथब्रश, पावडर, खोबरेल तेल आदींसाठी शासनाकडून निधी मिळतो. हा निधी मुलांवर खर्च होण्याऐवजी संस्था चालकांच्या खिशांमध्ये जात आहे. या संस्थांमध्ये जी मुले शिकत आहेत त्यांच्या पालक किंवा नातेवाईकांनाच हे साहित्य आणायला भाग पाडते. नातेवाईकांचा नाईलाज असल्याने मुलांच्या काळजीपोटी हे साहित्य आणून दिले जाते. मात्र, हे साहित्य संस्थेने खरेदी केल्याचे भासवले जाते. यासोबतच नातेवाईकांना मुलांच्या वह्या पुस्तके, कपडे, बूट, पेट्या आदी साहित्य ठराविक दुकानांमधूनच खरेदी करण्यास भाग पाडले जाते. या दुकानदारांकडून कमिशन उकळण्याचे प्रकार घडत आहेत. अनेकदा काही संस्था तर मुलांना प्रवेश देताना नातेवाइकांकडून हजारो रुपये उकळत असल्याचीही उदाहरणे आहेत. या सर्व गैरकारभाराकडे महिला बालकल्याण समिती का कानाडोळा करीत आहे हा संशोधनाचा विषय आहे. बारामती येथील मुलांच्या वसतिगृहामध्येही अशाच एका मुलासाठी दहा हजार मागण्यात आल्याचा आरोप लाईफ फोर्सिंग हेल्प फाऊंडेशनचे हमीद सलमानी यांनी केला आहे.जिल्हा सल्लागार मंडळाने केलेल्या तपासणीदरम्यान महिला सेवाग्राममधील अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. एक मुलगी २००४ मध्ये सेवाग्राममध्ये दाखल झाली. शाळा सोडल्याचा दाखला पाहिला असता ती २०१३ मध्ये सातवीमध्ये होती. सातवी उत्तीर्ण झाल्याचा दाखला तिला देण्यात आला होता. तिच्याशी मंडळाच्या सदस्यांनी चर्चा केली असता ती सातवी उत्तीर्ण झाली असून तिला आठवीच्या वर्गात बसविले असे सांगितले. वास्तविक ती नववीमध्ये असणे आवश्यक असतानाही तिला सातवी झाल्याचा दाखला देण्यात आला. या मुलीचे एक वर्षाचे नुकसान झाले आहे. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नोंदणी क्रमांक नाही, संस्थेतून बदली करताना सेवाग्रामने तिच्या भावाकडून अर्ज लिहून घेतला. त्याआधारे तिची बदली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण कनिष्ठ व वरिष्ठ बालगृहामध्ये केली. मात्र, त्याच्या भावाची सही शंकास्पद असल्याचे निदर्शनास आले होते. बालकल्याण समितीने सेवाग्राम संस्थेला विचारणा न करता तिची बदली केल्याचे समोर आले होते. या संस्थेत यापुढे सातवीच्या पुढील मुलींच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, तसेच अशा संस्थांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट शिफारस करण्यात आली होती. महिला सेवाग्राममधील एकूण नऊ मुली बालकल्याण समितीच्या आदेशाने पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे संस्थेचे म्हणणे होते. परंतु, तपासणीवेळी मुली पालकांच्या ताब्यात देताना त्यांचे अर्ज घेतलेले नसल्याचे निदर्शनास आले. त्या आदेशांवर आदेश क्रमांक नसल्याचेही नमूद करण्यात आले होते.असे एक नाही तर तब्बल आठ मुलींच्याबाबतीत घडले होते. या मुलींना शिरूरच्या बालगृहामध्ये पाठविण्यात आले होते. या मुलींनी शिरूरच्या बालगृहाच्या अधीक्षिकांकडे अर्ज देऊन नववीमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात विनंती केली होती. शिरूरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकांनीही संबंधित अधीक्षिकांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांचे दाखले आणि गुणपत्रके पाठविण्याची विनंती केली होती. त्यानंतर बालगृहाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या उपायुक्तांना पत्र देण्यात आले. त्यामध्ये संबंधित मुली कुसुमताई मोतीचंद महिला सेवाग्राममधून ८ वी उत्तीर्ण होऊन बालगृहात दाखल झाल्या आहेत. मात्र या मुलींचे शाळा सोडल्याचे दाखले व गुणपत्रके सेवाग्रामकडून मिळालेले नाहीत. या मुली तात्पुरत्या स्वरुपात रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत बसत होत्या. दाखले व गुणपत्रके न मिळाल्याने त्यांना नववीच्या वर्गात प्रवेश देण्यास शाळेने परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांना परत संस्थेमध्ये पाठविण्यात आले. सेवाग्राम संस्थेने आठवीच्या वर्गासाठी पुणे महापालिकेचे लेखी परवानगी न घेताच या मुलींना आठवीला बसविले होते. त्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही संस्थेला आठवीच्या वर्गाची मान्यता मिळाली नाही. त्यामुळे दाखले व गुणपत्रके देता येणार नसल्याचे पत्राद्वारे सेवाग्रामने बालगृहाला कळविले होते. अशा अनेक मुलांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून त्याकडे समाजकल्याण विभाग आणि शासनाचेही दुर्लक्ष होत आहे.वेश्यावस्तीमधील एका वेश्येचा मुलगा मी बारामती येथील मुलांच्या वसतिगृहामध्ये ठेवला होता. काही दिवसांतच त्या मुलाच्या अंगावर खरुज झाली. त्याच्या हाता-पायांवर भेगा पडल्या होत्या. जखमा झालेल्या होत्या. त्याला मी परत घेऊन आलो. या संस्थेमध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्याकरिता मुलांच्या नातेवाइकांकडून दहा दहाहजार रुपयांची मागणी केली जाते. ठराविक दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य, बूट, कपडे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जातो.- हमीद सलमानी, लाईफ फोर्सिंग हेल्प फाऊंडेशन, धनकवडी
अनागोंदी कारभारामुळे मुलींचे झाले शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:42 AM