लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. मात्र, बोर्डाच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सह्याद्री वाहिनीवरून लवकरच हे कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी वेळ मिळावा,यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, सह्याद्री वाहिनेने शिक्षण विभागाऐवजी एमकेसीएलला वेळ दिला. त्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक, संशोधन व संशोधन परिषदेने एमकेसीएल बरोबर ‘टिलीमिली’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी-बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले. त्यामुळे काही दिवस विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेता आले. परंतु, कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील आणखी काही जिल्ह्यातील प्रत्यक्ष वर्ग पुन्हा बंद केले. परिणामी विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे.
आज होणार शिक्कामोर्तब
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी काही दिवस बाकी असताना विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सह्याद्री वाहिनीवरून शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रम लवकरच प्रसारित करणार आहे. शिक्षण विभागाला दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम प्रसारित करण्यास सह्याद्री वाहिनीने वेळ देणार असल्याचे तोंडी सांगितले आहे. मात्र, तरी शुक्रवारी (दि. ५) त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.