पुणे : उन्हाच्या असह्य चटक्यांनी पुणेकरांच्या अंगाची काहिली होत असताना पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसलाही उन्हाचा चटका बसू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्गावर बस बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी मार्गावरील सुमारे १४०० बसपैकी १६० बसचे ब्रेकडाऊन झाले. काही दिवसांपुर्वी हे प्रमाण १४५ ते १५० पर्यंत होते. काही दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला आहे. तीन-चार दिवसांत ४२ ते ४३ अंशपर्यंत पारा गेल्याने मागील शंभर वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. उन्हातून चालणे किंवा दुचाकीवरून जाण्याचेही अनेक जण टाळत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. या उन्हाच्या चटक्याचा फटका पीएमपीच्या बससेवेलाही बसू लागला आहे. काही दिवसांपर्यंत इंजिनमध्ये बिघाड, वायरिंगचे शॉर्टसर्किट, टायर पंक्चर यांसह विविध तांत्रिक कारणांमुळे दररोज सरासरी १५० बस बंद पडत होत्या. आता उन्हाच्या तीव्रतेमुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढू लागले आहे. रविवारी पीएमपीच्या मालकीच्या ७४ तर भाडेतत्वावरील ८६ बस मार्गावर बंद पडल्या. मागील आठवड्यात बसची संख्या कमी होती. तुलनेने हे प्रमाण ८ ते १० बसने वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हामुळे इंजिन गरम होऊन बिघाड होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच काहीवेळा टायर पंक्चरच्याही तक्रारी आहेत. उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास ब्रेकडाऊन आणखी वाढू शकते. पण सध्यातरी हे प्रमाण नियंत्रणात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.----------ब्रेकडाऊनची सरासरीफेब्रुवारी - १५६मार्च - १५२दि. २८ एप्रिल - १६०-----------ताफ्यातील एकुण बस - १९७४मालकीच्या - १३५० ते १४००प्रत्यक्ष मार्गावर - १००० ते १०५०भाडेतत्वावरील - ६०२प्रत्यक्ष मार्गावर - ४२५ ते ४५०
उन्हाचा चटका '' पीएमपी '' लाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 7:58 PM
काही दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला आहे. तीन-चार दिवसांत ४२ ते ४३ अंशपर्यंत पारा गेल्याने मागील शंभर वर्षातील उच्चांक गाठला आहे.
ठळक मुद्देरविवारी पीएमपीच्या मालकीच्या ७४ तर भाडेतत्वावरील ८६ बस मार्गावर पडल्या बंद