पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे वाहतूक पाेलिसांकडून वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याने त्याचा परीणाम आता दिसून येत आहे. 2018 च्या जानेवारी महिन्यात 27 प्राणांतिक अपघात पुणे व परिसरात झाले हाेते. हेच प्रमाण जानेवारी 2019 मध्ये 15 वर आले आहे. याची टक्केवारी 44.44 इतकी आहे. वाहतूक पाेलीस करत असलेल्या कारवाईमुळे हे प्रमाण कमी हाेण्यास मदत झाली आहे.
भारतात अपघातात प्राण गमविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त हाेत असतात. शहरातही विविध कारणांमुळे अपघातात जीव जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा वाहतूकीचे नियम न पाळणे, दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणे तसेच रस्तांमध्ये असणारे दाेष यांच्यामुळे वाहनचालकांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न पुणे वाहतूक पाेलिसांनी सुरु केला. शहरातील ज्या भागात सातत्याने अपघात हेतात असे ब्लॅक स्पाॅटची यादी करण्यात आली. त्या भागांमध्ये करावायची सुधारणा याबद्दल पुणे महानगरपालिकेशी वाहतूक शाखेने पत्रव्यवहार केला. तसेच शहरात कारवाई कडक करण्याता आली. तसेच नियमभंग करणाऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले. सध्या शहरात 26 समुपदेशन कार्यक्रम राबविण्यात येत असून दरराेज 100 नियमभंग करणाऱ्या नागरिकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.
त्याचबराेबर 100 नंबरवर ट्रॅफिक जाम बद्दलचे येणारे फाेनही आता कमी झाले आहेत. जानेवारी 2017 मध्ये 202 काॅल आले हाेते, 2018 मध्ये 190 तर जानेवारी 2019 मध्ये हे प्रमाण 162 इतके कमी झाले हाेते. हेल्मेट सक्तीचा देखील सकारात्मक परीणाम दिसून येत आहे.