पुणे : चीनमध्ये थैमान घातलेल्या काेराेना व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर पन्नास हजाराहून अधिक नागरिकांना याची लागण झाली आहे. याचा परिणाम आता विविध उद्याेगांवर हाेत असल्याचे समाेर आले आहे. चीनमधून माेबाईलचे डिस्ल्पे आणि विविध अक्सेसिरीजची निर्यात थांबली असल्याने भारतात या गाेष्टींची किंमत वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे माेबाईलच्या अक्सेसिरीज दुप्पट भावाने विकल्या जात आहेत.
चीनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काेराेना व्हायरसमुळे अनेक कंपन्या, उत्पादने ठप्प झाली आहेत. चीनमधून माेठ्याप्रमाणावर इलेक्ट्राॅनिक वस्तू आणि खेळण्यांची निर्यात हाेत असते. विविध कंपन्यांचे माेबाईल चीनमध्येच तयार केले जातात. तसेच त्यांचे अक्सेसिरीज सुद्धा तिकडेच उपलब्ध हाेतात. काेराेना व्हायरसमुळे माेबाईल अक्सेसिरीजचे उत्पादन माेठ्याप्रमाणावर घटले आहे. त्यामुळे त्याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. चीनमधून या वस्तू भारतात येत नसल्यामुळे भारतात याचा तुटवडा भासत आहे. अक्सेसिरीजच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
पुण्यातील इलेक्ट्राॅनिक मार्केटमध्ये माेबाईल अक्सेसिरीजचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे माेबाईलचे डिसप्ले आणि इतर अक्सेसिरीजची किंमत वाढली आहे. त्याचबराेबर इतर इलेक्ट्राॅनिक वस्तू देखील चढ्या भावाने विकल्या जात आहेत.आणखी काही महिने तरी चिनी वस्तू बाजारात चढ्या भावाने विकल्या जाणार असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
मागील काही दिवसांपासून मोबाईल स्पेअरपार्ट आणि विशेषतः डिस्प्लेचा तुटवडा भासत आहे. यामुळे जादा दराने याची विक्री होते. आणखी किती दिवस ही परिस्थती राहील हे सांगता येणार नाही, असे अप्पा बळवंत चौकातील मोबाईल व्यावसायिक कपील यांनी सांगितले.