धायरी : सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प इतर निर्मनुष्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अन्यथा शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
वडगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर १, ५६, ५७ व ५८ या जमीन मिळकतीमध्ये महापालिकेच्या वतीने कचरा निर्मूलन करण्याकरिता जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. या जागेवर महापालिकेच्या वतीने कचरा निर्मूलन व विघटन प्रकल्प बांधून तो कार्यान्वित देखील झालेला आहे.
या जागेला लागून ऐतिहासिक वारसा असलेले वडजाईमाता मंदिर आहे. तसेच वडगांव खुर्दचे ग्रामदैवत आहे. माही पौर्णिमा व नवरात्री उत्सव याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या प्रकल्पामध्ये जमा होणारा कचरा हा इतरत्र पसरलेला असतो. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या कचरा प्रकल्पावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिसरात असलेल्या मधुकोष, प्रयेजा सिटी, देवीआई नगर व सनसिटी या भागातील नागरिकांना या कचऱ्यामुळे होणाऱ्या उग्र वासामुळे त्रास होत आहे. नागरिकांच्या तसेच पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून भविष्यात या प्रकल्पामुळे गंभीर स्वरूपाचे आजार, विकार होण्याची शक्यता असल्याने हा प्रकल्प निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, राजाभाऊ चव्हाण, अनिकेत देशमुख,विजय वैराट,कौस्तुभ पुरंदरे, संग्राम गायकवाड यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
--------------------
कचऱ्याच्या वाढत्या दुर्गंधीमुळे लहान मुले, वृध्द आजारी पडत आहेत. एक- एक पैसा गोळा करून मेहनतीने बांधलेल्या घरात आता नागरिकांना राहायलाही नको वाटते आहे. यावर महापालिकेने लवकर तोडगा काढावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
- भरत कुंभारकर, शिवसेना उपशहरप्रमुख
----------------------
फोटो ओळ : वडगाव खुर्द येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाहेर साठविण्यात आलेला कचरा.