पुणे : देशातील माता-बालमृत्यूचे प्रमाण चिंता वाटायला लावणारे आहे. केंद्र व राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करतेच आहे; पण खासगी कंपनीचे सहकार्य मिळवून त्यासाठी आपल्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करणारी पुणे महापालिका ही बहुधा देशातील पहिलीच महापालिका असावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.फिनोलेक्स इंडस्ट्रिज व मुकुल माधव फाउंडेशन यांचे सहकार्य घेऊन महापालिकेच्या त्यांच्या सोनवणे व राजीव गांधी अशा दोन रुग्णालयांमध्ये विशेष अतिदक्षता कक्ष सुरू केला आहे. एकूण ५ ठिकाणी असे कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा करार बापट यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरली मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले, फिनोलेक्सच्या रूता छाब्रिया, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, आदी या वेळी उपस्थित होते.महापालिकेच्या वतीने अनेक चांगले उपक्रम सुरू होत आहेत. त्यातील हा एक आहे. यातून अनेक मुले व त्यांच्या माता यांचे प्राण वाचतील, असे बापट म्हणाले.महापौर टिळक यांनी महापालिकेचे ३ कोटी व फिनोलेक्सचे ३ कोटी, अशा ६ कोटी रुपयांमधून हे विशेष कक्ष सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली.
माता-बालमृत्यू रोखण्यास दक्ष - पुणे महापालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 7:16 AM