पुणे - देशातील प्रमुख आयटी हबपैकी एक असलेल्या पुण्याचा इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होणाऱ्या दहा शहरांमध्येही समावेश असल्याने ई-कचरा संकलनासाठी महापालिकेने शहरात १३ कायमस्वरूपी केंद्रे सुरू केली आहेत. त्याद्वारे गेल्या चार वर्षांत शहरातील १५७ टन ई-कचरा संकलित करून प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे टीव्ही, संगणक, मोबाईल, लॅपटॉप आणि त्यांचे चार्जर्स अशा अनेक वस्तू असतात. हे सगळे खराब झाले, की तसेच टाकून दिले जाते. अशा प्रकारे साचणाऱ्या इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ई-कचऱ्याची समस्या जगभर उभी ठाकली आहे. ई-कचरा निरुपद्रवी दिसत असला, तरी त्यात पर्यावरणासाठी अनेक घातक घटक असतात. त्यामुळेच घरातील रोजच्या कचऱ्र्यासोबतच या वस्तू फेकल्याने होणारे घातक प्रदूषण टाळण्यासाठी व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेने धोरण निश्चित करून योजनबद्ध प्रयत्न केले आहेत. शहरात दरमहा सरासरी तीन टनांहून अधिक इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो. तो संकलित करण्यासाठी आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ई-कचरा स्वीकारण्याची सुविधा आहे. गेल्या चार वर्षांत १३ कायमस्वरूपी 'ई-कचरा संकलन केंद्रे' सुरू केली आहेत. याशिवाय २१ केंद्रांद्वारे महिन्यातून एकदा ई-कचरा गोळा केला जातो. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्याआणि प्रकल्पांमधून ई-कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेतर्फे महिन्यातून आठ ते दहा वेळा मोहीम राबविली जाते. या कामात 'पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन', 'जनवाणी', 'कमिन्स'सारख्या संस्था महापालिकेला साहाय्य करतात. शहरातून गोळा झालेला सर्व ई-कचरा 'महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळा'कडे प्रक्रियेसाठी पाठविला जातो. इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्यासाठी 'स्वच्छ' या संस्थेसह पुणे महापालिकेने एक फिरते केंद्र सुरू केले. तसेच या कचऱ्र्याचे वाढते प्रमाण पाहता महापालिकेच्या विविध आरोग्य कोठ्यांमध्ये आणि वॉर्ड कार्यालयांमध्येही ई-कचरा स्वीकारण्यात येतो.
----------------------------
ई-कचरा धोकादायक का?
मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, रिमोट, रेडिओ, बॅटरी इत्यादी रोजच्या वापरातील गोष्टी आपण कालांतराने फेकून देतो. या ई-कचऱ्यामध्ये असलेला पारा, शिसे आणि कॅडमियमसारख्या घटकांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. या कचऱ्र्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने न लावल्यास जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित होते. हे रोखण्यासाठी नागरिकांकडील ई-कचरा जमा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने यंत्रणा निर्माण केली आहे.
------------------------
सातत्याने वाढणारा ई-कचरा गोळा करण्यासाठीची भक्कम व्यवस्था महापालिकेने आता उभारली आहे. महापालिकेकडे ई-कचराजमा करण्याचे दिवस वाढविले आहेत आणि त्यात स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. यामुळे पुण्यात ई-कचरा जमा करण्याचे एक चांगले मॅाडेल उभे राहिले आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता
-----------