पुणे: लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी राज्य सरकार असे काहीतरी विषय समोर आणत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. बारामती येथे नेहमीप्रमाणे आढावा बैठकांसाठी पवार रविवारी (दि. २३) आले होते. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, हे सरकार येऊन दहा महिने झाले आहेत. विरोधी पक्ष सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आवाज उठवत आहेत. वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून अनेक मुद्दे हाती घेतले जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीला भेगा पडल्या असे म्हटले जाणारच. ४३ मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहीने घेता येतात. पहिले काही दिवस हे दोघेच मंत्री होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला. आत्ता फक्त २० च मंत्री आहेत. अजून २३ लोकं मंत्रीमंडळामध्ये भरली नाहीत. राज्यमंत्री कोणालाही केले नाही. एकाही महिलेला मंत्री केले नाही, हे घडलं आहे की नाही? असा उलट सवाल करत पवार पुढे म्हणाले, हे द्यायचं सोडून आणि तिसरच काहीतरी विचारायचं. लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी राज्य सरकार असे काहीतरी विषय समोर आणत आहे.
मला कोणी चांगले म्हणत असतील तुमच्या पोटात का दुखतं...
मुंबई येथील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नाही. नागपूर येथून येताना आमची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या सभेच्या परवानगीसाठी मी स्वत: लक्ष घालतो असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. नागपूरच्या सभेला परवानगी देताना सुद्धा त्यांनी नाटके केली होती. इतकेच लोक हवेत तितकेच लोक हवेत असे आडवेढे घेतले होते. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना सभा घेण्याचा अधिकार आहे. संविधानाच्या चौकटीत आपली मतमतांतरे प्रत्येकाने व्यक्त करावीत. मला जर कोणी चांगले म्हणत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे काय कारण? असा सवाल करत अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येकाने चांगले काम करावे. कोणी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे.