शिक्रापूर (पुणे) : दुष्काळी १२ गावांना पाणी मिळावे, यासाठी गेले काही दिवस प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सर्वात मोठे काम सिंचन विभागात करावे लागणार आहे. या गावांना पाणी मिळावे. यासाठी सरकार सकारात्मक आहे. निर्णायक वेळी बारा गावांतील प्रतिनिधींना घेऊन मुंबई येथे बैठक आयोजित करू, असा विश्वास शिरूरच्या बारा गावांच्या आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
दुष्काळग्रस्त भागातील बारा गावांतील आंदोलकांना सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भीमाशंकर कारखाना पारगाव (ता. आंबेगाव) येथे निमंत्रित केले होते. यावेळी वळसे पाटील बोलत होते. डिंभा धरण कळमोडी धरण तसेच कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या बाबतची सद्य:परिस्थिती सांगत वळसे-पाटील यांनी शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळग्रस्त बारा गावांच्या लोकप्रतिनिधींना खात्री बाळगा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केली असून, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी वळसे-पाटील यांनी दिली.
डिंभा धरणातून बोगदा करून पाणी माणिकडोहमार्गे करमाळ्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पाण्यासाठी सुद्धा आपली लढाई सुरू आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात नदीवर ६५ बंधारेदेखील पावसाळ्यानंतर धरणाच्या पाण्यावर भरले जातात. यामध्ये बदल होऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करीत आहोत. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार खेड तालुक्यातील व शिरूर तालुक्यातील गावांसाठी कळमोडीचे पाणी मिळावे. यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी संमती दर्शविली आहे.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, प्रमोद पऱ्हाड, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, दादासाहेब खर्डे, अमोल थिटे, सनी थिटे, संदीप खैरे, भरत साकोरे, संदीप खैरे, सूर्यकांत थिटे, योगेश कदम, किशोर रत्नपारखी, संजय चौधरी, अरुण चौधरी, अर्जुन भगत, सनी थिटे, भगवान घोडेकर, भाऊसाहेब थिटे, नामदेव पानसरे, पांडुरंग लोखंडे व १२ गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये :
पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होऊन या प्रश्नांमध्ये मोठे यश येईल अशी अपेक्षा आहे. पाणीप्रश्न सोडविताना कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये. त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून चर्चा करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.