खोडद : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आंब्याची असलेली वेगळी वैशिष्ट्ये जगासमोर आणण्यासाठी जागतिक बाजारपेठेत या आंब्यांना वेगळा दर्जा व स्थान मिळावे, जेणेकरून तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी जुन्नर तालुक्यातील हापूस आंब्यांना स्वतंत्र असे भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी मी प्रयत्नशील असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. असे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील हापूस आंब्यांना भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केल्याबद्दल जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आमदार अतुल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अतुल बेनके बोलत होते.
जुन्नर तालुक्यात अगदी मोगल काळापासून आंबा लागवडीचे संदर्भ सापडतात. आंब्याची हापूस ही हवामान आणि जमीन याला अतिशय संवेदनशील असणारी जात आहे. या भागात शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी पासून हापूस या जातीची चांगली उत्पादनक्षम आणि निरोगी झाडे दिसून येतात. या भागात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या काळात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी हापूस आंब्याची रोपे लावली.आजही हा आंबा जुन्नर हापूस या नावाने बाजारपेठेत प्रसिद्ध आहे.
या भौगोलिक मानांकनासाठी शास्त्रीय अभ्यास प्रगतिपथावर आहे. यामध्ये वेगळेपण आढळल्यानंतर, पुढील प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करणार आहोत. यासाठी राजगुरुनगर उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या भौगोलिक मानांकनासाठी नारायणगावचे कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग यांचे मार्फत याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.उद्यानविद्या तज्ञ भरत टेमकर, मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव, वनस्पती रोगतज्ञ प्रा. राधाकृष्ण गायकवाड ,नारायणगाव मंडल कृषी अधिकारी प्रमोद बनकर या तज्ञ समितीने जुन्नर व आंबेगाव परिसरातील हापूस आंबा आणि कोकण हापूस यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तपासण्यासाठी प्रत्यक्ष नमुने आणि त्याचे विश्लेषण सुरू केले आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न विश्लेषण प्रयोगशाळेमध्ये हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामधील गुणवैशिष्ट्यांचा आधारावर पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. अशी माहिती पुणे जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांनी दिली.
जुन्नरमधील हापूस आंबा हा अतिशय वेगळा असून जागतिक पातळीवर 'शिवनेरी हापूस' या नावाने आपला ब्रँड तयार व्हावा आणि पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना त्याचा विशेष फायदा व्हावा या उद्देशाने हा दूरगामी निर्णय घेऊन यासाठी विशेष पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. जुन्नरमधील आंब्याला भौगोलिक मानांकन मिळेल असा विश्वास आहे.
-अतुल बेनके, आमदार, जुन्नर
१८ खोडद
जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आमदार अतुल बेनके यांचा सत्कार करण्यात आला.