पुणे : देशात गरीब कुटुंबाबरोबरच सधन कुटुंबामध्येदेखील कुपोषित बालके आढळतात. याला आहारपद्धती कारणीभूत आहे. त्यात फास्टफूडचा जमाना असल्यामुळे योग्य पोषणमूल्य आहार बालकांना मिळत नाही. त्यासाठी शिशु संजीवनी या पूरक आहारामुळे बालकांना योग्य पोषण आहार मिळणे गरजेचे आहे.
गडचिरोली येथील मुलांसाठी शिशु संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये उत्पादन गुणवत्ता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर देशात दूध उत्पादनाबरोबर गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय दुग्धजन्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले. 'गोबर से समृद्धी' या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या बायोगॅस स्लरी प्रक्रियेचा शुभारंभ केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
रुपाला म्हणाले, परदेशात दुग्ध व्यवसायाबरोबरच पशूंकडेही अधिक लक्ष दिले जाते. गाई , म्हैस ५० लीटर दूध देतात, त्यांचे संगोपन चांगले केले जाते. त्यामुळे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, देशात दूध उत्पादन कमी आहे. यासाठी दूध व्यवसायाबरोबरच दुग्धजन्य पदार्थांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बायोगॅस प्रकल्पामुळे पर्यावरण रक्षणाचेदेखील काम होईल. त्यामुळे देशाचाही फायदा आहे. या प्रकल्पांतर्गत २५००० बायोगॅस तयार होणार आहे. यासाठी देशभर लाखोंच्या संख्येने बायोगॅस संयंत्र उभारणीची गरज आहे.