अवसरी (पुणे) : साखर कारखानदारी हा मोठा उद्योग असून त्या माध्यमातून राज्य सरकारला दरवर्षी ५ हजार कोटी महसूल मिळतो. त्यामुळे राज्यातील अडचणीत असणारे सर्व साखर कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
पारगाव दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहांमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ज्या साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यांना राज्य बँकेने किंवा एनसीडीसी यांनी कर्ज दिल्याने कारखाने सुरू झाले आहेत. जे कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत त्यांच्याकडे तारण ठेवण्यासारखे काही नाही. त्या कारखान्यांना बँकांनी कर्ज दिले नसून या पुढील काळात कुठल्याच साखर कारखान्यांना कर्ज देणार नसल्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे.
या वर्षी उसाचे उत्पादन कमी झाले असून पुढच्या वर्षीही उसाचे उत्पादन घटणार असल्याचे वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भूमिका घेत असून समाजामध्ये अंतर निर्माण होणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.