पुणे : मुद्रित माध्यमांसाठी शासनाने अनेक गोष्टी केल्या आहेत, त्या डिजिटल माध्यमांना कशा लागू होतील, याचा विचार करू. यांसह ट्रस्टमार्फत पत्रकारांच्या मुलींचे शिक्षण आणि वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न करणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डिजिटल मीडिया पॉलिसी आणणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर यांच्या वतीने डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी पाटील बाेलत हाेते. यावेळी आयोजक हेमंत जाधव, समीर देसाई, सिद्धार्थ भोकरे, उल्का मोकासदार, आदी उपस्थित होते. तत्पूर्वी कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते झाले.
पाटील म्हणाले, डिजिटल मीडियामधील अनेक चांगली चॅनेल्स सुरू आहेत. त्या रांगेत सर्वच यूट्यूब चॅनेल्स जाऊन बसतील का? हा विचार या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराने करावा. डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा हेतू काय ? हे या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराला कळणे आवश्यक आहे.
‘लाेकमत’चे संपादक संजय आवटे म्हणाले, डिजिटल पत्रकारितेत आपला स्वत:चा प्रेक्षकवर्ग तयार करणे गरजेचे आहे. युट्यूब हे डिजिटल पत्रकारितेमधील सर्वांत प्रभावी माध्यम आहे. चांगला कंटेंट तयार करून युट्यूबच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळविता येते. तेजाेनिधी भंडारे, प्रणवकुमार चित्ते, माेहिनी घाटे, प्रणव पवार, उमेश तावसकर यांनी मार्गदर्शन केले.
डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेचे लाेकशाहीकरण : प्रशांत नारनवरे
प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आहे. डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेचे लोकशाहीकरण झाले आहे. पत्रकारिता करताना स्वआचारसंहिता तसेच कोणते नियम पाळावेत, हे महत्त्वाचे आहे. ‘एआय’मुळे भाषण करणे साेपे झाले असले तरी सामाजिक जबाबदारीचे भानही ठेवणे गरजेचे आहे.