पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्यासोबत पुणे-दिल्ली प्रवासात भयंकर प्रकार घडल्याचं समोर आलं. चव्हाण यांना दिलेल्या जेवणात अंड्याचं कवच असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत त्यांनी एअर इंडिया प्रशासनाला तक्रार केली असून प्रशासनानेही वंदना चव्हाण यांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे.
5 तारखेला खासदार वंदना चव्हाण या पुणे-दिल्ली प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांनी ब्रेकफास्टसाठी आमलेट मागविलं. त्यावेळी हे आमलेट खाताना त्यांना त्यामध्ये अंड्याच्या कवचाचे तुकडे आढळल्याचे दिसून आलं. त्यावरुन त्यांनी ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल खासदार वंदना चव्हाण यांनी एअर इंडियाला ट्विटरवरुन तक्रार केली. यामध्ये त्यांनी एअर इंडिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, डीजीसीए आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालयालाही टॅग केलं आहे.
दरम्यान, वंदना चव्हाण यांच्या तक्रारीचं दखल घेत एअर इंडिया प्रशासनाने संबधित ठेकेदाराला दंड ठोठावला असून यापुढे भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाही याबाबत काळजी घेऊ असं सांगितलं आहे.