एम-३ करंडक आंतरक्लब : २३ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम ३ करंडक आंतरक्लब २३ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत तनिष जैन (नाबाद ७४ धावा) व अनिकेत पोरवाल (७९ धावा) यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर ॲंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ‘केडन्स’ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ‘केडन्स’चा डाव ४४.३ षटकात २०० धावांवर संपुष्टात आला. सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर प्रद्युम्न चव्हाण यांनी चौथ्या गड्यासाठी ६६ चेंडूत ३३ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षल काटेने ७० चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ६९ धावा आणि इझान सईदने ३४ चेंडूंत ३१ धावा फटकावत आठव्या गड्यासाठी ५९ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली.
२०१ धावांचे लक्ष्य अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने ३३.२ षटकात २ बाद २०३ धावा करून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज बाद झाल्यावर अनिकेत पोरवालने ६६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकाराच्या मदतीने ७९ धावा चोपल्या. तनिष जैनने ९५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद 74 धावा केल्या. पोरवाल व जैन यांनी दुसऱ्या गड्यासाठी १३७ चेंडूत १४० धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. सामन्याचा मानकरी तनिष जैन ठरला.
स्पर्धेतील विजेत्या ॲंबिशियस क्रिकेट अकादमी संघाला करंडक, तर उपविजेत्या केडन्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष विकास काकतकर, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, ‘एमसीए’चे सचिव रियाज बागवान, बीसीसीआयचे माजी खजिनदार अजय शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आदी यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्तम
सर्वोत्कृष्ट फलंदाज : स्वप्निल फुलपगार (डेक्कन जिमखाना, २९५ धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : इझान सय्यद(११ विकेट, केडन्स)
मालिकावीर : तनिष जैन(ॲंबिशियस, १९९ धावा व 9 विकेट)
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक : स्वप्निल फुलपगार (१३ विकेट, डेक्कन जिमखाना)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : पवन शहा (४ झेल व ३ धावबाद, व्हेरॉक)
फोटो - जेएम एडिटला मेल केला आहे.