पुणे : कोरोनाच्या सावटामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम नागरिकांनी रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी केली. महापालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत सर्वांनी घरीच नमाज पठण आणि शिरखुर्माचा गोडवा लुटत, गरजूंना मदतीचा हात देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ईदचा आनंद द्विगुणीत केला.
दरवर्षी नातेवाईकांना घरी बोलावून ‘ईद मुबारक’ म्हणत एकत्रितपणे ईद साजरी केली जाते. मात्र सलग दुस-या वर्षी मुस्लिम नागरिकांनी ईद घरीच साजरी केली. मशिदी बंद असल्याने आणि कोरोनामुळे एकत्र येण्यास बंधने असल्याने मोबाईलवरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरखुर्मा थेट पार्सल देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मुस्लिम नागरिकांनी ईदसाठी नवीन कपडे खरेदी करता आले नाहीत. काहींनी ऑनलाईन खरेदी केली. नमाजची वेळ निश्चित नसल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत नमाज पठण करण्यात आले. काही मुस्लिम धर्मियांनी गरीब बांधवांना दान केले.