वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यात नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे (वय ३८) याचा वेल्ह्यात विसावा हॉटेलमध्ये सोमवारी (दि.६) गोळ्या झाडून तोंडावर धारदार शस्त्र (सत्तूर,चाकूने, कुकरी )ने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. तपासामध्ये जमीन व्यवहारात हस्तक्षेप आणि एक वर्षापूर्वी मुलाचा झालेल्या मृत्यूला नवनाथ हा जबाबदार असल्याच्या कारणावरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे.
माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे (वय ५६, रा. पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे. सध्या रा. २२५,२२६, काळभोरवाडा, शुक्रवार पेठ, पुणे), आकाश कुमार शेटे, (२४), यश ऊर्फ प्रथमेश विनायक चित्ते (२२), अक्षय गणेश साळुंखे (२७), शुभम राजेश थोरात (२१, सर्व रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेल्हे तालुक्यातील पाबे येथे राहणारा नवनाथ रेणुसे याचा खून करण्यात आला होता. पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे याने जमीन व्यवहारात हस्तक्षेप आणि एक वर्षापूर्वी मुलाचा झालेल्या मृत्यूला नवनाथ हा जबाबदार असल्याच्या कारणातून त्याचा खून केला होता. रेणुसे हा साथीदारासह किरकटवाडी (ता. हवेली) या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले.
खून करण्यापुर्वी ज्ञानेश्वर रेणुसे याने त्याची पत्नी कुंदा (वय ४५), मुलगी पल्लवी भूषण येणपुरे (३०), मुलगी गौरी अमोल ऊर्फ शशिकांत शिंदे(२७) यांच्यासह मिळून खुनाचा कट तयार करून केलेल्या कटाप्रमाणे हा गुन्हा केल्याचे तपासांत निष्पन्न झाले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील हे करीत आहेत.