पिंपरी पेंढार (पुणे) : कल्याणनगर महामार्गावर पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) परिसरात म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ म्हशी ठार व दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या तसेच चालकासह दोघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. १०) पहाटे साडेपाच वाजता घडली.
मुंबई येथून कल्याणनगर महामार्गाने म्हशी घेऊन जाणारा टेम्पो ( एम एच ०३ डी व्ही ५७२०) पिंपरी पेंढार परिसरातील साईनगर येथील वळणदार ठिकाणी आला असता चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याचे लगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या दुर्घटनेत टेम्पोत भरलेल्या १० म्हशींपैकी ८ म्हशी जागीच ठार झाल्या तर चालक व आणखी एकजण जखमी झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिल्लारी व डॉ. कैलास लुधरकर यांनी म्हशींची तपासणी करून ८ म्हशी मृत असल्याचे घोषित केले. तर दोन गंभीर झाल्याबाबत अधिकचा तपास ओतूर पोलिस करत आहेत.