पुणे : पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांना टूथपेस्ट, मसाले, तांदूळ, गहू यासह विविध तीस वस्तूंचा समावेश असलेले जीवनावश्यक आणि दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचे पाकिट दिले जाईल. एका कुटुंबाला किमान आठ दिवस पुरेल इतका शिधा त्यात असेल,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती व मदत कार्याची माहिती त्यांनी दिली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर पातळी धोक्याच्या वर असली तरी पाण्यामधे चांगली घट होत आहे. पुणे ,कोल्हापूर महामार्गावरील पाणी ओसरु लागल्याने सोमवारी पाण्याचे टँकर, इंधनाचे ट्रक आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडले. अजूनही सामान्य वाहतुकीसाठी हा मार्ग खुला केलेला नाही. डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्राधान्याने पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. तो पर्यंत टँकर आणि बाटलींबद पाण्याचा पुरवठा केला जाईल. तसेच, स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात येईल. याशिवाय शिबीरातून आपल्या घरी जाणाºया नागरिकांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ आणि दहाकिलोगहू दिले जाईल. शिवाय प्रत्येक कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतके गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी, मसाला असा शिधा, या शिवाय टूथ पेस्ट, ब्लँकेट अशा विविध ३० वस्तूंचे पाकिट देण्यात येईल. एखाद्या कुटुंबात सदस्यांची संख्या अधिक असल्यास, त्यांना त्या प्रमाणात शिधा पाकिटे दिली जातील. बाधित झालेल्या शाळा, सरकारी इमारती, नागरिकांची घरे याचे सर्वेक्षण करण्यात येईल. त्याच्या आधारे नुकसान झालेल्या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच, अनेक मुलांचे वह्या-पुस्तके व शालेय साहित्य पाण्यामुळे खराब झाले आहे. त्यांना शालेय साहित्य दिले जाईल. याशिवाय रस्त्यांची पाहणी करुन तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असल्याचे डॉ. म्हैसेकर म्हणाले. ---नुकसानभरपाईसाठी मृत जनावरांच्या शवविश्चेदनाचा आग्रह नाहीपूरामधे मृत्यू पावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जनावरांच्या शवविश्चेदनाचा आग्रह धरला जाणार नाही. प्रत्येक मृत जनावराचे जीपीएस ट्रॅकींग केले जाईल. त्या आधारे नुकसानभरपाई दिली जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
तीन ते चार दिवसांत गावे स्वच्छ केली जातीलपूर ओसरल्यानंतर गावांत आणि शहरी भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, तीन ते चार दिवसांच गावे स्वच्छ केली जातील. त्या साठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासेल. पुणे-पिंपरी चिचंवड महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी सांगली-कोल्हापूरला पाठविण्यात आले आहेत. प्रसंगी लगु मुदतीच्या निविदेद्वारे स्वच्छता कर्मचारी नेमण्यात येतील.