वाल्हे (पुणे) : दहा-बारा दिवसांपूर्वी वाल्हे परिसरामध्ये ड्रोन फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता ड्रोन गायब झाला असून, रविवारी रात्री वाल्हे येथील एकूण आठ घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी काही किरकोळ वस्तू नेल्याचे उघडकीस आले आहे.
सध्या पावसाचे वातावरण असून, थोडा पाऊस वाढला की वीज जाते. रविवारी रात्री पावसाची रिमझिम चालू होती. त्यामध्ये सहा घरांना बाहेरून कुलूप होते. त्यामध्ये जुनी मुलींची मराठी शाळा शेजारी राहणारे नारायण दुर्गाडे, पवार आळी येथील दत्तात्रय पवार तसेच पवार आळीतील गायकवाड वाड्यामधील दिलीप उबाळे, त्याचबरोबर सुमन शिंदे सिद्धार्थनगरमधील रमाकांत भोसले, माळवाडी येथील विजय राऊत, त्याचबरोबर ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराजवळ राहणारे विठ्ठल पवार, वाल्हे-पुणे-पंढरपूर महामार्गालगत राहणारे मुन्ना पठाण यांच्याही घराचे कुलूप तोडून काही ऐवज नेल्याचे सांगण्यात आले.
या चोरीची माहिती कळल्यानंतर जेजुरी येथील पोलिस पथकाने वाल्हे परिसरात सर्व ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, पोलिसांकडून उशिरापर्यंत याबाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.