नीरा (ता.पुरंदर) ज्युबिलंट कंपनीत एकेकाळी ७०० पेक्षा जास्त कायम कामगार होते. तिथे आता केवळ ७० कायम कामगार काम करीत आहेत, तर ४०० ते ५०० कामगार हे कंत्राटी कामगार आहेत. यातील बहुतेक कामगार हे दुसऱ्या राज्यातील कामगार आहेत. त्यांच्या जागेवर केंद्र सरकारच्या नियमानुसार ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या वतीने बुधवारी ज्युबिलंट कंपनीवर या मागणीसाठी मोर्चा नेण्यात येणार होता. मात्र, कोविड असल्याने हे आंदोलन करू नका, असे जेजुरी व वडगाव निंबाळकर पोलिसांनी सुचविल्याने ठरावीक लोकांच्या उपस्थितीत ८०० अर्ज कंपनीकडे देण्यात आले असल्याची माहिती दत्ता चव्हाण यांनी दिली.
यावेळी त्यांच्या सोबत भूमिपुत्र रोजगार हक्क समिती अध्यक्ष बी. जी. काकडे, विजयराव काकडे, दत्ताजी चव्हाण, गोरख निगडे, शशिकांत काकडे, धैर्यशील काकडे, एस.वाय. काकडे, टी. के. जगताप, रमेश जेधे, प्रवीण जाधव, माऊली निगडे, विलास काकडे, चेतन सकुंडे, मोहन मोहिते, शहाजी सोनवणे, सतीश माणिकराव काकडे, संदीप काकडे, शंभुराजे काकडे, योगेश निगडे यांच्यासह अनेक स्थानिक युवक उपस्थित होते.
दरम्यान, श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी बुधवारी नीरा येथे स्थानिक तरुणांशी व ज्युबिलंटमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी गेली ३७ वर्षे या कंपनीच्या कामगार संघटेचे काम केले आहे. मला कोणी स्थानिक नाही असे म्हणत असले तरी मीसुद्धा इथलाच आहे. माझ्या कुटुंबाची जमीन इथे आहे आणि सोमेश्वर साखर करखान्याला आमचा ऊस जातो. ज्यांना ते भूमिपुत्र आहेत, असे वाटते त्यांनी प्रथम इथल्या लोकांना नोकऱ्या द्याव्यात. कंपनीत स्वतः ठेकेदारी करून लोकांचे कायम रोजगार बुडविणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हणत त्यांनी ज्युबिलंटचे कामगार संघटनेचे अध्यक्ष सतीश काकडे यांना टोला लगावला.
फोटोओळ : ज्युबिलंट कंपनीकडे बुधवारी ८०० भूमिपुत्रांनी नोकरीच्या मागणीचे अर्ज भूमिपुत्र रोजगार हक्क समितीच्या वतीने दिले.