पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे. या चिठ्ठ्यांमध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, शिवसेना एक आणि काँग्रेसच्या एका सदस्याला बाहेर पडावे लागले.महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीची स्थापन करण्यात आली, याला एक वर्षे पूर्ण झाले. स्थायी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो, परंतु दर वर्षी अर्ध्या म्हणजे ८ सदस्यांना समितीतून बाहेर पडावे लागते. यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व १६ सदस्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या करून ८ सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या बाहेर काढल्या जातात. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनी आठ सदस्यांच्या चिठ्ठ्या काढल्या. यामध्ये भाजपच्या स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, हरिदास चरवड, योगेश समेळ, बॉबी टिंगरे या चार सदस्यांना स्थायी समितीतून बाहेर पडावे लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे आणि प्रिया गदादे या दोन महिला सदस्यांचा समावेश आहे. काँगे्रसचे अविनाश बागवे, शिवसेनेचे नाना भानगिरे यांना देखील बाहेर जावे लागले आहे. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य बाहेर पडले तेवढ्याच नविन सदस्यांना आता स्थायी समितीमध्ये सधी मिळणार आहे. यामुळे स्थायी समितीत आपली वर्णी लावण्यासाठी भाजपच्या इच्छुक सदस्यांकडून आता जोरदार मोर्चेबांधणी सुरु होईल.सध्या स्थायी समितीमध्ये पक्षीय बलाबलनुसार भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक एक सदस्य यांचा समावेश आहे. आता भाजपला नव्याने चार सदस्यांची, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येक एक सदस्यांची स्थायी समितीवर नियुक्ती करावी लागणार आहे. फेबु्रवारीमध्ये होणाऱ्या मुख्यसभेत आठ सदस्यांची नावे सादर करून त्यानंतर नविन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या अविनाश बागवे यांच्यासह आठ सदस्य पडले पुणे महापालिकेच्या स्थायी समितीबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:33 PM
महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे.
ठळक मुद्देस्थायी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा, दर वर्षी अर्ध्या सदस्यांना पडावे लागते बाहेरभाजपच्या इच्छुक सदस्यांकडून सुरु होईल जोरदार मोर्चेबांधणी