पुणे : स्थायी समितीच्या आठ रिक्त जागांवर मंगळवारी सर्वसाधारण सभेत आठ नगरसेवकांची निवड करण्यात आली. त्यात ५ महिला आहेत. बहुसंख्य नव्यांनाच संधी मिळाली असल्यामुळे स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीमध्ये आता महिला सदस्यांची संख्या लक्षणीय असेल. मार्च महिन्यात आता समितीची बैठक होऊन त्यात अध्यक्षांची निवड केली जाईल.महापालिकेतील पक्ष कार्यालयात पक्षनेत्यांनी त्यांच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये आपापली नावे निश्चित केली. नवनियुक्त सदस्यांची नावे याप्रमाणे. भारतीय जनता पार्टी- योगेश मुळीक, रंजना टिळेकर, दिलीप वेडे पाटील, उमेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस- लक्ष्मी दुधाने, स्मिता कोंढरे, शिवसेना, संगीता ठोसर, काँग्रेस-वैशाली मराठे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला सदस्यच निवृत्त झाल्या होत्या,त्यामुळे त्यांनी त्या जागेवर महिला सदस्यांचीच निवड केली.जेवढे सदस्य चिठ्ठीने निवृत्त झाले होते, तेवढ्याच सदस्यांना स्थायी समितीत पाठवण्याची संधी पक्षांना होती. नव्या-जुन्यांचा मेळ घालत पक्षनेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने नावे निश्चित केली.सभेचे कामकाज सुरू होताच महापौर मुक्ता टिळक यांनी पक्षनेत्यांनी त्यांनी निश्चित केलेली नावे बंद पाकिटात द्यावीत, असे आवाहन केले. सर्वांची पाकिटे मिळाल्यानंतर, त्यांनी नावे वाचून दाखवली.नवनियुक्त ८ व आधीच्या ८ अशा १६ सदस्यांची बैठक आता मार्चमध्ये होईल. त्यात अध्यक्षांची निवड होईल. दरम्यान, समितीचे विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ जे चिठ्ठी निघाल्यामुळे समितीमधून बाहेर पडले आहेत, ते २६ किंवा २७ फेब्रुवारीला सन २०१८-१९ या आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मांडतील. त्यामुळे नव्या अध्यक्षांना आता थेट पुढच्या वर्षीच त्यांचे अंदाजपत्रक मांडण्याची संधी मिळणार आहे.
‘स्थायी’च्या आठ सदस्यांची निवड जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:43 AM