स्टार ११८९
पुणे : मित्राला भेटायला जाणाऱ्या अल्पवयीन १४ वर्षांच्या मुलीवर रिक्षाचालकांनी बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. अशा एखाद्या घटनेला मोठी वाचा फुटते. त्याची चर्चा होते. मात्र, आजही पुण्यासह देशभरातील विविध शहरांमध्ये दररोज महिला विकृत वासनेच्या शिकार होत असतात. पुणे शहरात गेल्या ८ महिन्यांत तब्बल १४३ महिला अशा विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत.
गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्याने सर्व जण घरात बंद होते. तेव्हापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. असे असले तरी मोबाईल चॅटिंग वाढले आहे. मोबाईल चॅटिंग करताना एकमेकांचे प्रेम जुळण्याचे प्रकार वाढलेले दिसून येतात. त्यातून ते प्रत्यक्ष भेटतात. एकमेकाला आणाभाका दिल्या-घेतल्या जातात. त्यातूनच तरुण वयात त्यांच्यात शारीरिक आकर्षणातून संबंध प्रस्तापित होतात. पुढे त्यांच्यात भांडणे, वाद झाल्यानंतर तरुणीला फसविल्याची भावना निर्माण होते. त्यातून अनेकदा लैगिंक अत्याचार केलेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.
.......
गतवर्षीच्या तुलनेत १३८ टक्के वाढ
२०२० मध्ये पुणे शहरात ८ आठ महिन्यांत १०३ बलात्कारांच्या घटनांची नोंद केली होती. यंदा ऑगस्ट २०२१ अखेर शहरात १४३ बलात्कारांचे गुन्हे दाखल आहेत. ही वाढ १३८ टक्के इतकी आहे.
........
अत्याचार करणारे बहुतांशी परिचित
बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये बहुतेक जण एकमेकांच्या परिचयाचे असतात. अनेकदा ते जवळ राहणारे, संबंधित तरुणी, महिलेचे नातेवाईक असतात. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल होत असते.
अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून, तसेच बऱ्याच वेळा त्यांना धमकावून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना समोर येतात. धक्कादायक म्हणजे काही प्रकरणात प्रत्यक्ष त्यांच्या वडिलांनीच कुकर्म केले असल्याचे आढळून आले आहे.