वडगाव निंबाळकर : मुली होत असल्याने विवाहितेचे गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील लोणी भापकरनजीक माळवाडी येथील एका कुटुंबातील पाच जणांवर, तर गर्भपात करण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरसह तीन अज्ञात, अशा एकूण आठ व्यक्तींवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेंद्र दिगंबर लोणकर (नवरा), दिगंबर खंडू लोणकर (सासरा), साखराबाई दिगंबर लोणकर (सासू) (तिघे रा. माळवाडी, ता. बारामती), मीनाक्षी हरिश कोद्रे (नणंद, रा. मुंढवा हडपसर, पुणे), वंदना शिवाजी लोणकर (चुलत सासू, रा. भिगवण रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या कुटुंबातील लोकांची नावे असून, गर्भपात करण्यास मदत करणारे अज्ञात दोन इसम व डॉक्टर असे आठ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रियंका महेंद्र लोणकर (वय २४, सध्या रा. (माहेर) जेजुरी, ता. पुरंदर) या विवाहितेने तक्रार दिली आहे. चार वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर घरातील व्यक्तींनी छळ केला. यानंतर दोन वेळा गरोदर असताना फलटण (जि. सातारा) येथे नेऊन गर्भलिंग निदान चाचणी केली. मुलगी असल्याचे निदर्शनास आल्याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. यानंतर पुन्हा गर्भ राहिल्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात घडविला, अशी फिर्याद पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने भूमाता ब्रिगेडच्या सुनीता कसबे, कल्पना जाधव, छाया नांदगुडे, परविन पानसरे, रोहिणी कुदळे, प्रियांका जगताप, मनीषा सुतार यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिल्याने तक्रार नोंदविण्यात आली. गुन्हा दाखल होईपर्यंत भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या पोलीस ठाण्यात बसून होत्या. (वार्ताहर)गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. त्यांना लवकर ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
डॉक्टरासह आठ जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: July 26, 2016 5:21 AM