पिंपरी : जमिनीच्या वादातून आठ ते दहा जणांच्या टोळीने शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास केलेल्या प्राणघातक हल्ल्यात पिंपळे गुरव येथील इनायतुल्ला शेख (वय ४७ वर्षे) यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर पसार झाले. संशयितांपैकी ८ आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपी फरार आहेत. फिरोज शेख यांनी आरोपींविरुद्ध सांगवी पोलिसांकडे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव, पवनानगर येथे इनायतुल्ला शक्रुद्दीन शेख यांच्यावर आठ ते दहा जणांनी हल्ला केला. डोक्यावर, छातीवर, हातावर शस्त्राने वार केले. त्यांनतर हल्लेखोर तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री १२ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शब्बीर शेख, कौय्युम शेख, कौसिफ शेख, शोएब जावेद, बबलू शेख, जावेद शेख, शमुशुद्दीन शेख, सलमान शेख (सर्व रा. दापोडी) या संशयितांना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपी फरार झाले आहेत. आरोपी शब्बीर शेख तसेच मयत इनायतुल्ला शेख हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. जमिनीच्या वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत असत. त्यांच्यातील पूर्ववैमनस्यातून शुक्रवारी इनायतुल्ला शेख यांचा खून झाला. सांगवी पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
खूनप्रकरणी आठ जण चौकशीसाठी ताब्यात
By admin | Published: June 27, 2015 11:56 PM