पुणे : सिंहगड रस्त्यावर एका कारमध्ये शस्त्रांची विक्री सुरू असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण आठ पिस्तुले व २० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या तिघांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खून, घरफोडी तसेच मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.सनी मुरलीधर सदाफुले, नितीन सुधाकर अवचिते आणि जगदीश पोपट दराडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी आरोपी अवचिते हा पिस्तूल घेण्यासाठी सिंहगड रस्ता परिसरात येणार होता.त्याला पिस्तूल देण्यासाठी एक जण चारचाकी गाडीतून येणार होता. त्यानुसार सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून ७ पिस्तुले, १ रिव्हॉल्वर व २० काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली कार व मोटार सायकल अशा एकूण ८ लाख ७२ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतीश निकम, सहायक पोलीस निरीक्षक संपत पवार, लक्ष्मण ढेंगळे, सहायक फौजदार केदारनाथ कांबळे, पोलीस हवालदार राजकुमार तांबे, शैलेश जगताप, अविनाश पवार, अनिल नलावडे, पोलीस नाईक रुपेश वाघमारे, अतुल गायकवाड, फिरोज बागवान, अनिरुद्ध सावर्डे व प्रसाद जंगीलवाड यांनी ही कारवाई केली.
गुन्हेगार टोळीकडून आठ पिस्तुले जप्त
By admin | Published: September 30, 2015 1:41 AM