प्रसाद कानडे
पुणे : पुणे - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील ६ पदरीचे काम अद्यापही अपूर्ण आहे. २०१३ साली सुरू झालेले हे काम अजूनही पूर्ण झाले नाही. यासाठी १७५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. अजूनही या मार्गाचे काम पूर्ण होण्यास आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या अर्धवट कामामुळे, तसेच मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज प्रवास करणाऱ्या ६० हजार वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचा भाग असणारा पुणे-सातारा १४० किमीचा आहे. यात ७२ किमी हे सातारा जिल्ह्याच्या हद्दीत येते, तर ६८ किमीची हद्द पुणे जिल्ह्यांत येते. २०१० साली रिलायन्स कंपनीस या कामांचा ठेका दिला. डीबीएफओटी (डिझाइन बिल्ड फोरम ऑपरेशन ट्रान्स्पोर्ट) याअंतर्गत रिलायन्सने काम करण्याचे ठरले. यासाठी या मार्गावर २०१० ते २०३४ सालापर्यंत कंपनीस टोलवसुलीचे अधिकार दिले. करारानुसार २०१३ पर्यंत सहा पदरीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही हे काम सुरूच आहे. जवळपास ८ वर्षे उलटून गेले तरीही राष्ट्रीय प्राधिकरणास हे काम पूर्ण करता आले नाही. यादरम्यान या मार्गावर शेकडो अपघातात अनेकांचा बळी गेला.
केवळ वेगाचा विचार. मात्र, मार्गात त्रुटी अनेक
पुणे-सातारा हा मार्ग पुढे बंगळुरूशी जोडला जातो. वेगवान वाहतूक व्हावी या हेतूने ११० किमी वेग येथे निर्धारित करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेगाचा विचार केला गेला. मात्र, आजही या मार्गावरच्या त्रुटी दूर झाल्या नाहीत. महामार्गाला जोडणारी २५ ठिकाणे खूप धोकायदाक आहेत. महामार्गावर बाजूच्या गावातून येणारे वाहन व पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येणारे वाहन यांच्या वेगात मोठी तफावत असते. वेगात मोठा फरक असल्याने पाठीमागून येणारी वाहने थेट पुढच्या वाहनांना पाठीमागून धडकत आहेत.
रस्त्यांवर खड्डे आणि खड्ड्यात ‘पेव्हर ब्लॉक’
‘खेड-शिवापूरचा टोल नाका ओलांडला की पुढच्या मार्गात अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. याची दुरुस्ती करताना मक्तेदाराकडून होणारा ‘पेव्हर ब्लॉक’चा वापर अत्यंत चुकीचा आहे. यामुळे रस्त्याच्या मूळ उंचीत फरक पडतो. शिवाय ते नियमबाह्यही आहे. पैसे वाचविण्यासाठी मक्तेदार ही शक्कल लढवीत आहेत. त्याचा फटका टोल देणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे.
''पुणे-सातारा महामार्गावरील सहा पदरी मार्गाचे काम २०१३ ला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले होते. आता काम प्रगतिपथावर आहे. मार्च २०२२ पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे असे पुणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सरव्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले.''