चाकण - येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी मोबाईलवर झालेल्या शाब्दिक भांडणातून हा खून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ( दि. १५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात हि घटना घडली. अनिकेत संदीप शिंदे ( वय १६, रा. पानसरे मळा, शिक्रापूर रोड, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ओंकार मनोज बिसनाळे ( वय १७, रा. पोस्ट ऑफिस शेजारी, चाकण ) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्याच्यावर येथील येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी रात्री घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. काल रात्री ११ वाजून ९ मिनिटांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी ओंकार झगडे, किरण धनवटे, तेजस रेपाळे, पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख, महिंद्र ससाणे व परेश गुंडानी ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) या आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मयत अनिकेत शिंदे याने ओंकार झगडे यास मोबाईल वर कॉल करून ‘तू आम्हाला जाता येताना कुत्रा असे म्हणतो?’ असे विचारले असता झगडे याने त्यास ‘तुम्ही ऑपोझिट गॅंगचे आहात, तुम्हाला कुत्रा नाहीतर काय म्हणायचे’, असे म्हणालेने फोनवरून एकमेकांना शिवीगाळ करून त्यांच्यात शाब्दिक भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून झगडे याने गुरुवार ( दि. १५ ) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास अनिकेत शिंदे यास फोन करून तुझ्या दुकानावर येतो, असे म्हणाले असता शिंदे याने त्यास किल्ल्यामध्ये बोलाविले. यावेळी फिर्यादी बीसनाळे, अनिकेत शिंदे व रामनाथ उर्फ टिल्ल्या सुखदेव घोडके हे किल्ल्यात जाऊन थांबले. यावेळी ओंकार झगडे व किरण धनवटे हे त्यांची डी ओ मोटारसायकलवरून व इतर सहाजण हातात लोखंडी कोयते व रिव्हॉल्वर अशी हत्यारे घेऊन जमावाने पायी चालत आले. यावेळी झगडे याने बिसनाळे यास बाजूला घेऊन त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. व किरण याने बिसनाळेच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून ट्रिगर दाबला परंतु गोळी फायर झाली नाही. यावेळी त्याच्या हातातून सुटून दोघेही मराठी शाळेच्या दिशेने पळत जात असताना अनिकेत हा ठेस लागून खाली पडला असता झगडे व किरण याने त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर इतर सहा जणांनी त्याच्या डोक्यात प, तोंडावर, गळ्यावर व मानेवर वार केले. आणि झगडे याने मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून खून केला. जखमी ओंकार बिस्नाळे याच्या फिर्यादीवरून काल रात्री उशिरा आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डी वाय एस पी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव हे पुढील तपास करीत आहेत.
शाळकरी मुलाच्या खूनप्रकरणी चाकणमधील आठ तरुणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 6:14 PM