पुणे : ती प्रसुतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झालेली... पण सासूला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचीही चाचणी घेतली. त्यात तिलाही लागण झाल्याचे कळले... त्याच दिवशी तिने मुलीला जन्म दिला...बाळाच्या चाचणीत ते कोरोनामुक्त होते, पण कोरोनाच्या घट्ट विळख्याने आई आपल्या काळजाच्या तुकड्याला एकदाच डोळे भरून पाहू शकली. तर मुलगीही आईच्या वात्सल्यापासून दुरावली. आई कोरोनामुक्त झाल्यानंतर १८ दिवसांनी या मायलेकीची भेट झाली.पर्वती दर्शन येथे राहणारी एक २६ वर्षीय गर्भवती महिला प्रसुतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाली होती. त्यादिवशी तिच्या सासूलाही कोविड रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. सासूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपकार्तील नातेवाईंचा शोध सुरू झाला. तेव्हा सुनेला याच रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लगेच सुनेचीही चाचणी घेण्यात आली. प्रयोगशाळा अहवालात दि. १६ एप्रिलला तिला कोरोना विषाणुचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत तिची प्रसुती झाली होती. सुमारे अडीच किलो वजनाच्या गोंडस मुलीला जन्म दिला होता. डॉक्टरांनी तातडीने मुलीचीही कोरोना चाचणी केली. सुदैवाने आईकडून बाळाला संसर्ग झाला नव्हता. पण बाळ आईकडे दिले असते तर बाधित झाले असते. म्हणून बाळाला प्रसुतीनंतर लगेच लहान मुलांच्या वॉर्डमध्ये नेण्यात आले. तिथे बाळाला पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातील मिल्क बँकेतील दुध दिले गेले. मुलीची प्रकृती ठीक असल्याने चार दिवसांनी तिला नातेवाईकांकडे सोपवून घरी पाठविण्यात आले.इकडे आईचा कोरोनाशी लढा सुरूच होता. तर दुसरीकडे मुलीला भेटण्याची आस होती. एक-एक दिवस पुढे सरकत होता. अखेर कोरोनाशी सुरू असलेला आईचा लढा मंगळवारी (दि. ५) संपला. सलग दोन्ही दिवस तिचे कोरोना संसर्गाचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी तिला घरी सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. त्यानंतर १८ दिवसांच्या दुराव्यानंतर दोघी मायलेकींची भेट झाली.---------------आई कोरोनामुक्त झाली असली त्यांना आवश्यक दक्षता सांगितले आहे. बाळाजवळ जाताना तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुवणे, घराबाहेर न पडणे आदी काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच बाळाला दुध देण्यात काही अडचण नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनामुळे दुरावलेल्या " त्या " मायलेकी भेटल्या अठरा दिवसांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 12:18 PM
आई होती बाधित, बाळ घरी
ठळक मुद्देससून रुग्णालयात प्रसुती इकडे आईचा कोरोनाशी लढा सुरू तर दुसरीकडे मुलीला भेटण्याची आस