पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मेपासून देशातील १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे जाहीर केले आहे़ मात्र, याबाबतचे आदेश केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून पुणे महापालिकेला अद्यापही प्राप्त झालेले नाहीत़ त्यामुळे ऐनवेळी १ मे पासून सुरू होणाऱ्या या लसीकरणाचे नियोजन करायचे तरी कसे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे़
दरम्यान, हे याबाबतचे आदेश आले नसले, तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने किती जणांना आता लस द्यावी लागेल़ १८ वर्षांवरील युवांना ही लस देताना, आहे त्या लसीकरण केंद्रांवर गर्दी कशी होणार नाही याकरिता अन्य काही ठिकाणी सोय करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे़
पुणे शहरात सध्या शासकीय १०२ व खासगी ७० लसीकरण केंद्र कार्यान्वित आहे़ याठिकाणी २२ एप्रिलपर्यंत साधारणत: ७ लाख २० हजार जणांना लस देण्यत आली आहे़ लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने आणखी काही प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत़ यामध्ये १० शासकीय व २२७ खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे, मात्र अद्यापही त्याला केंद्राने मान्यता दिलेली नाही़
परिणामी, १ मेपासून जेव्हा १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात होईल त्यावेळी नियोजन कसे करावे, असाही प्रश्न आता निर्माण होत आहे़ दरम्यान, अद्यापही दिवसाला आवश्यक तेवढा लस पुरवठा पुणे महापालिकेला होत नाही़ अशावेळी नव्या लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे़
--------------------
लसीकरण केंद्रांसाठी माननीयांचा दबाव
शहरातील आहे त्याच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नसताना, आपापल्या प्रभागात नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी काही माननीय आरोग्य खात्याकडे तगादा लावत आहेत़ अमूक एकास परवानगी दिली आम्हाला का नाही, असा प्रश्न वारंवार उपस्थित करून, काहीही करा पण माझ्या वॉर्डात आणखी एक लसीकरण केंद्र सुरू करा असा आग्रह काहींकडून धरला जात आहे़
नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारचे काही नियम आहेत. त्यामुळे माननीय म्हणतील त्या सगळ्यांच ठिकाणी हे केंद्र सुरू करता येत नाहीत. असे स्पष्ट करूनही माननीयांचा हा तगादा कायम असून, अधिकाऱ्यांना मात्र माननीयांच्या रोषाला यामुळे विनाकारण सामोरे जावे लागत आहे़
----------------------------------