पालकांमध्ये चिंता, मुलींमध्ये भिती : डॉक्टर म्हणतात काळजी घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळकरी मुलींचे लवकर वयात येण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. हीच पालकांसाठी चिंतेची बाब ठरू लागली आहे. मुलींना मासिक पाळी येण्याचे सर्वसाधारण वय हे १२ किंवा १३ वर्ष आहे. मात्र वाढती ‘स्थूलता’, व्यायामाचा अभाव, प्राणिजन्य प्रथिनांचे (मांस, दूग्धजन्य पदार्थ) अतिसेवन, अनुवांशिकता, कौटुंबिक कलह व ताणतणाव या कारणांमुळे मुलींना वयाच्या आठव्या आणि नवव्या वर्षीच मासिक पाळी येऊ लागली आहे.
यातील एक गंभीर गोष्ट म्हणजे ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. ऑनलाईन माध्यमांसह ओटीटी व्यासपीठावर प्रौढांसाठीच्या विषयांना कोणतीही कात्री न लावता प्रसिद्धी दिली जात असल्याने मुलांपर्यंत या गोष्टी चुकीच्या पद्धतीने पोहोचत आहेत. त्यांच्यात हे विषय जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होत आहे. मेंदूमधील ‘हायपोथेलेमस’ ग्रंथींचा हार्मोन्सशी संबंध आहे. बदलत्या हार्मोन्समुळे मुलींच्या ओव्हरीजवर परिणाम होणे हे देखील एक कारण असू शकते, असा अंदाज स्त्रीरोगतज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबत अद्याप संशोधन झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
स्त्रीरोगतज्ञ व वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की लहान मुलींचा आहार हा देखील लवकर पाळी येण्यास कारणीभूत असू शकतो. विशेषत: ‘सोयाबीन’ हा घटक. आहारातून, श्वसनातून शरीरात जाणारी रसायने आणि कीटकनाशकेही या समस्येला कारणीभूत असू शकतात. मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि त्यामुळे वाढलेले वजन हेच असू शकते. वयात येणाऱ्या मुलींमध्ये लठ्ठपणाचे वाढते प्रमाण ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. अशावेळी त्यांना कमी कॅलरीज असलेला आहार घ्यायची आणि रोज व्यायाम करण्याची सवय लावणे अपरिहार्य आहे. यातच मुलांच्या ‘ऑनलाईन अँक्टिव्हिटी’वर देखील पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
हार्मोन्स असंतुलित
“पोषक आहाराचा अभाव, हार्मोन्सचे असंतुलन या गोष्टींमुळे मासिक पाळीचे वय हे एक ते दीड वर्षांनी कमी झाले आहे. कधीकधी मेंदू किंवा एखाद्या शारीरिक आजारामुळे देखील हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. तेव्हा पालकांना मुलांच्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो.”
- डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोगतज्ञ
------------------------------------------------------