पुणे : टोल नाक्यावर नियमित होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था व सर्व्हिसरोडकडे केलेले दुर्लक्ष व स्थानिक नागरिकांच्या प्रश्नावार वारंवार नोटीसा देऊन, बैठका घेऊन देखील संबंधिताकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे या भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळेच येत्या रविवारी (दि.१५) रोजी या संदर्भांत स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांची बैठक बोलवण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराने त्यावर तोडगा न काढल्यास खेड शिवापूर टोल नाका बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी वाहतूक विषयक बैठकीत दिला. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवार (दि.१३) रोजी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक प्रश्नासंदर्भात बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर ,महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील ,वाहतूक उपायुक्त, यांच्यासह परिवहन, रस्ते विकास महामंडळ रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून पुणे- सातारा महामार्गावरील प्रामुख्याने खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली व इतरही उपाय-योजना करण्यात आल्या आहेत. परंतु महामार्ग प्राधिकरणाकडून सर्व्हीस रोडची कामे व्यवस्थित करण्यात आलेली नाही, स्थानिक लोकांना विचारत न घेता मार्ग करण्यात आलेल्या कनेक्टीव्हीटीचा प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे बैलगाड्यासह ट्रॅक्टर तसेच शेती विषयक वाहने आणि स्थानिक वाहतूक करणारी वाहनांना महामार्गावर आल्याशिवाय पर्याय नाही. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या आहेत. बैठका घेतल्या तरी देखील सर्विस रोड आणि त्याच्या उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी सर्व्हिस रोडची कामे पूर्ण केली नसल्याने वाहतूक कोंडी आणि टोल नाक्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे बैठकीत सांगितले. तेव्हा डॉ. नीलम गो-हे यांनी खेड-शिवापूर टोल नाक्यालगतच्या महामागार्ची विभागीय आयुक्तांचा प्रतिनिधी म्हणून महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, खेड शिवापुर टोल नाक्याच्या आणि वाहतूक कोंडी संदर्भात रविवारी स्थानिक गावकरी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक होत आहे. महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराकडून वाहतूक कोंडीचा प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास खेड शिवापूर टोल नाका बंद केला जाईल असे स्पष्ट केले. महामार्ग रुंदीकरणासाठी अपेक्षित जमीन भूसंपादन करून महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात दिली आहे ती कामे पूर्ण करून वाहतूक कोंडी सोडविण्याची गरज आहे सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाला निर्णय घेणे भाग पडणार आहे असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
... तर खेड शिवापूरचा टोल नाका बंद करू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:35 PM
गेल्या काही वर्षांपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण
ठळक मुद्देजिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचा इशारापुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक प्रश्नासंदर्भात बैठकसंबंधिताकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष